संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यंदा शेतीसह पर्यावरण, बदलते हवामान, वाणिज्य, प्रक्रिया उद्योग अशा अनेक बाबींवर चर्चा होणे अपेक्षित आहे.
शेतमालाच्या हमीभाव वाढीच्या प्रश्नासह बदलत्या हवामानाचा शेती आणि उत्पादकांना बसणारा फटका, खते आणि कृषी निविष्ठांच्या वाढत्या किंमती, कृषी निर्यातीवर वाढते निर्यात मूल्य, कांदा, सोयाबीन, कापूस, दूध आणि ऊसाचे प्रश्न यावर सरकारला विरोधक घेरण्याची शक्यता आहे. विशेषत: हमीभावाचा प्रश्न लक्षवेधी ठरू शकतो.
दरम्यान केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री श्री किरेन रिजिजू हे संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी संसदेच्या दोन्ही सभागृहातील राजकीय पक्षांच्या सदस्यांची बैठक घेणार आहेत. ही सर्वपक्षीय बैठक, 24 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता, नवी दिल्लीत संसद भवन ॲनेक्स या इमारतीच्या मुख्य समिती कक्षात होईल. संरक्षणमंत्री श्री राजनाथ सिंह या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील.
संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबर 2024 रोजी सुरू होईल आणि सरकारी कामकाजाच्या अत्यावश्यक गरजांनुसार , अधिवेशन 20 डिसेंबर 2024 रोजी संपू शकेल. 26 डिसेंबर 2024 रोजी असलेला संविधान दिन साजरा करण्याच्या निमित्ताने, लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक होणार नाही, असेही समजत आहे.