द्राक्षांशी संबंधित उद्योगांना चालना मिळावी तसेच द्राक्ष उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे यामुळे राज्य सरकारने राज्यातील १३ वाइन उद्योगांना सुमारे पंधरा कोटींचे अनुदान देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. याबाबतचा शासननिर्णय जाहीर करण्यात आला आहे , राज्यातील वाइन उद्योगांना सरकारच्या या निर्णयामुळे मोठाच आधार मिळणार आहे. राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे गारपिटीमुळे नुकसान होत असते .
ते नुकसान भरून निघावे, तसेच सुकामेवा बनविणे, द्राक्ष लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, तसेच द्राक्षापासून आर्थिकदृष्ट्या जास्त फायद्यासाठी पर्यायी उत्पादनांची निर्मिती व्हावी, द्राक्षावर आधारित असलेल्या वाइन उद्योगास प्रोत्साहन मिळावे म्हणून राज्यामध्ये उत्पादित केलेल्या व अंतिमतः विक्री झालेल्या वाइनच्या विक्रीवर शासनाने द्राक्षप्रक्रिया उद्योग धोरणानुसार देय असलेल्या २० टक्के मूल्यवर्धित कर भरल्यास वाइन उद्योगाला त्यापैकी १६ टक्के कराच्या रकमेइतके वाइन प्रोत्साहन अनुदान देण्यात येईल अशी मंजुरी २२ मार्चला दिली आहे.
त्यानुसार राज्यातील १३ वाइन उद्योगाला सुमारे पंधरा कोटींचे अनुदान मिळणार आहे. मंत्रिमंडळाच्या ४ फेब्रुवारीला झालेल्या बैठकीच्या निर्णयानुसार प्रोत्साहन योजनेंतर्गत वाइन उत्पादक घटकास प्रलंबित दावे निकाली काढणे व या योजनेची अंमलबजावणी पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार राज्यकर सहआयुक्त मोठे करदाते, राज्यकर सहआयुक्त (व्हॅट व्यवस्थापन) सोलापूर ,राज्यकर सहआयुक्त (व्हॅट व्यवस्थापन) नाशिक विभाग नाशिक, राज्यकर सहआयुक्त पुणे, यांच्याकडून प्रोत्साहन परताव्याबाबत प्राप्त प्रस्ताव व उद्योग संचालनालयामार्फत सादर केलेल्या अहवालानुसार तीन वर्षांच्या (२०२१, २२ आणि २३ )प्राप्त प्रलंबित दाव्यांकरिता १४ कोटी ९९ लाख ४५ हजार २१५ एवढ्या निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले होते.
संबंधित वाइनरीजकडे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे दावे प्रलंबित असल्याने ते निकाली काढणे गरजेचे आहे.५५ दावे एकूण प्रलंबित आहेत. तथापि वित्त विभागामार्फत २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता एकूण १५ कोटी निधी सुधारित अंदाजाच्या मर्यादेत वितरणासाठी उपलब्ध करून दिला आहे. या मधून १३ वाइनरीजचे प्रलंबित दावे निकाली काढण्यासाठी मान्यता दिली आहे.
अनुदान मिळणारे वाइन उद्योग
◼️ ओकवूड वाइनरी प्रा. लि. नाशिक ः ४०,८३,८९५
◼️ फटेली वाइन्स प्रा. लि. सोलापूर ः १,४४,६२,७३२
◼️निरा व्हॅली ग्रेप वाइन्स प्रा.लि. नाशिक ः ९, ७३, ०७०
◼️ गुद्ध ड्रॉप बाईन सेलर्स लि. नाशिक ः ९३, ५०,७५८
◼️ सोमंदा वाइन यार्डस् प्रा. लि. नाशिक ः १६,०९,७२०
◼️ ग्रेप्सी वाइन्स अॅन्ड बेवरेज, पुणे ः २.४८,६२२
◼️ सुला वाइन यार्डस् प्रा. लि. नाशिक ः ५, ८८,१०,३७५
◼️ हिल क्रेस्ट फुड्स अॅन्ड बेवरेजेस पुणे ः ४, ५२, ८८७
◼️ यॉर्क वाइनरी प्रा.लि. नाशिक ः ४३, ९७,२९४
◼️ विनलॅन्ड वाइन्स कंपनी, नाशिक ः १, १६,२५२
◼️ फटेली वाइन्स प्रा.लि. सोलापूर ः १,६२,७३.३०७
◼️ फटेली वाइन्स प्रा. लि. सोलापूर ः ३, ७८, ९८, ९०४
◼️ ग्रेप सिटी वाइनरी, सांगली ः १२, ६७, ३९९












