
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी मतदारांना प्रभावित करण्यासाठी सरकारने अनेक घोषणा केल्या. त्यापैकीच एक होती हमीभावाने सोयाबीन खरेदी करणाऱ्या केंद्रांची. मतदानाच्या ऐन दोन दिवस आधी ही केंद्रे सुरू करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. त्यानंतर बाजारात सोयाबीनचे बाजारभाव वधारून ४३०० रुपयांपर्यंत गेले. मात्र आज मतदानाच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २१ नोव्हेंबर रोजी बाजारातील सोयाबीनचे भाव काहीसे गडगडल्याचे दिसून आले.
लातूर बाजारसमितीत पिवळ्या सोयाबीनची सुमारे २४ हजार क्विंटल आवक झाली मात्र बाजारभावात दोन दिवसाच्या तुलनेत दीडशे ते दोनशे रुपयांची घसरण पाहायला मिळाली. आज लातूर बाजारसमितीत सोयाबीनला कमीत कमी ४ हजार २१ तर सरासरी ४१५० रुपये बाजारभाव मिळाला.
वाशिम बाजारसमितीत आज सोयाबीनची ३ हजार क्विंटल आवक होऊन सरासरी ४२६० रुपये बाजारभाव मिळाला. गंगाखेड आणि उमरखेड बाजारसमितीत सरासरी ४३५०, तर काटोल बाजारसमितीत सरासरी ३८५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.
अमरावती बाजारसमितीत सोयाबनीच्या लोकल वाणाची सुमारे साडेचार हजार क्विंटल आवक होऊन सरासरी ४ हजार रुपयांचा बाजारभाव मिळाला. हिंगणघाट बाजारात सुमारे अडीच हजार क्विंटल सोयाबीन आवक होऊन सर्वात कमी म्हणजेच सरासरी ३६०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.