महाराष्ट्रात तीनही हंगामात टोमॅटोची लागवड करता येत असल्यामुळे टोमॅटो हे महाराष्ट्राचे प्रमुख भाजीपाला पीक आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाचा टोमॅटो हंगामावर परिणाम झाला आहे.
महाराष्ट्रात तीनही हंगामात टोमॅटोची लागवड (Tomato cultivation) करता येत असल्यामुळे टोमॅटो हे महाराष्ट्राचे प्रमुख भाजीपाला पीक आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाचा टोमॅटो हंगामावर (Tomato Season) परिणाम झाला आहे.
शेतात पाणी साचून राहिल्याने अनेक ठिकाणी रोपांची मर झाली आहे. काही ठिकाणी फुलगळीसोबतच करपा, भूरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पिकात पाणी साचून राहिल्याने झाडांच्या मुळ्यांची कार्यक्षमता कमी होऊन कीड, रोगांच्या प्रादुर्भाव वाढला आहे.
त्यामुळे पीक संरक्षण खर्च वाढून उत्पादन खर्चातही वाढ होऊ शकते. टोमॅटो पिकातील रोग आणि किडींच्या नियंत्रणासाठी केव्हीके, नारायणगावचे पीक संरक्षण तज्ज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे यांनी सांगीतलेल्या पुढील उपाययोजना उपयुक्त ठरू शकतात.
टोमॅटो रोपांवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास सुरुवातीला पानाचे देठ गळणे, शिरा रंगहीन होणे ही लक्षणे दिसतात. त्यानंतर झाडाची जुनी खालच्या बाजूची पाने पिवळी पडतात. नवीन पाने तपकरी होऊन कुजतात. त्यामुळे झाडांचा अन्नपुरवठा खंडित होतो.
परिणामी, झाडाची वाढ खुंटते. झाड कोलमडून मरते. प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या खोडावर बुरशीचा गुलाबी थर दिसतो. मर रोगाच्या नियंत्रणासाठी टोमॅटो लागवडीनंतर ट्रायकोडर्मा व सुडोमोनास प्रत्येकी २ लिटर प्रति एकरी आळवणी करावी तसेच. कार्बेन्डाझिम (०.१ टक्के) १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
टोमॅटोवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास झाडाची पाने पिवळी पडतात. झाडाच्या खोड, फांदीवर तपकिरी व काळपट रंगाचे ठिपके दिसून येतात.
रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा कॉपरऑक्सिक्लोराईड २५ ग्रॅम किंवा अॅझॉक्झीस्ट्रोबीन १० मिली किंवा सिमोक्झॅनील अधिक मॅन्कोझेब २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून दर १० ते १५ दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करावी.
भूरी रोगामुळे पानांखाली आणि वरील बाजूस पिठाप्रमाणे पांढऱ्या बुरशीची वाढ झालेली दिसते. पाने, फुले, फळांवर पांढऱ्या बुरशीची पावडर डागांच्या स्वरूपात दिसते. अशी पाने कालांतराने पिवळी होऊन वाळतात, गळून जातात.
भूरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझोल १ मिली किंवा डिनोकॅप १ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून २ ते ३ फवारण्या कराव्यात.
रस शोषणाऱ्या किडीसाठी फिप्रोनिल १ मिली प्रति लिटर किंवा इमीडाक्लोप्रीड ०.३ मिली प्रति लिटर पाण्यात किंवा अॅसिफेट १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून किडनाशकाची आलटून पालटून फवारणी करावी.
Source:- agrowon