हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील बाजार समितीत हळदीला 30 हजार रुपये प्रति क्विंटल चा भाव मिळाला आहे. यामुळे हळद उत्पादक शेतकरी समाधानी झाले आहेत. हळदीला मिळालेला आतापर्यंत सर्वात उच्चांकी भाव असल्याचे बोलले जात आहे. हळदीचे हब म्हणून हिंगोली ची ओळख आहे.
राज्यामध्ये सांगली नंतर हिंगोली जिल्ह्यात हळद विक्री केली जाते. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात हळदीची विक्री हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत असल्याचे चित्र दिसत आहेत.
परभणी जिल्ह्यातील शेतकरी शेषेराव बोंबले यांच्या दर्जेदार हळदीच्या सहा कट्ट्याला तीस हजार तर शेतकरी मारोतराव पवार यांच्या 51 कट्ट्याला 25 हजार दर मिळाला. शुक्रवारी आवक मोठ्या प्रमाणावर झाली, दर्जेदार हळदीस उच्चांकी दरही चांगला मिळाला. यापेक्षाही जास्त दर हळदीस यावर्षी मिळेल, अशी अशा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
हिंगोली मधील हळदीचे मार्केट जिल्हाभरासह विदर्भात देखील प्रसिद्ध आहे येथील मार्केटमध्ये हळदीला दर देखील चांगला मिळतो.
हिंगोली बाजार समितीमध्ये हळदीची विक्री लिलाव पद्धतीमध्ये केली जाते. त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी येथे हळद विक्रीला आणतात. तसेच हळदीच्या दरात फारशी तेजी-मंदी होण्याची शक्यता नसून दर टिकून राहतील असा अंदाज हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान देशातील हळद काढणी झाल्यामुळे बाजारात हळद आवक होऊ लागली आहे. इतर जिल्ह्यात सुद्धा हळदीला चांगला भाव मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. हळदीला सुरुवातीला सर्वसाधारण भाव मिळत होता. परंतु आता मात्र चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत.