Unseasonal rain : महाराष्ट्रात वीजांसह अवकाळी पावसाचा अंदाज, कुठल्या भागात पडणार…

Unseasonal rain : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस महाराष्ट्रात अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह वीजांच्या कडकडाटात पाऊस होणार आहे. विदर्भात ३ आणि ४ मे रोजी वाऱ्याचा वेग ताशी ५०–६० किमीपर्यंत पोहोचू शकतो.

तापमानाच्या दृष्टीने पाहता, महाराष्ट्रातील बहुतांश भागांत कमाल तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअस घट होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी उष्णतेची तीव्रता कमी झाल्याने दुपारी उन्हापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. मराठवाडा आणि कोकण भागात मात्र काही ठिकाणी गरम व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.

देशाच्या इतर भागांबद्दल बोलायचं झालं, तर उत्तर भारतात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वादळ, गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा व राजस्थानमध्येही वादळी वाऱ्यांमुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राजस्थानमधील जैसलमेर येथे काल ४६.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, जे देशातील सर्वाधिक होते.

दक्षिण भारतात केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व कर्नाटकमध्ये वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून, काही भागांत उष्ण व दमट हवामान राहील. ओडिसा व छत्तीसगडमध्ये गारपीटीसह जोरदार सरी पडू शकतात.

नागरिकांनी शक्यतो घरात राहावे, उघड्यावर न जाता हवामान बदलाचे सतत निरीक्षण करावे, असे हवामान खात्याचे आवाहन आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा काढणी झालेल्या पिकांचे योग्य व्यवस्थापन करावे, असे सल्ले देण्यात आले आहेत.