अवकाळी पाऊस, गारपिटीचा अर्ध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फटका बसला आहे. राज्यात हजारो हेक्टर वरील फळबागा माती मोल झाल्या आहेत . 16 जिल्ह्यात नुकसानीचे मोठे आकडे समोर येत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेती पिकांची तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. काही भागांमध्ये झालेल्या गारपिटीने फळ बागांचे ही नुकसान झाले आहे. सध्या खरीप हंगामातील भात पिकांची काढणी सुरू आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये प्रामुख्याने काढणीच्या अवस्थेतील भात पिकास खूप मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
खरीप ज्वारीच्या पिकाचे ही नुकसान झाले आहे. याचबरोबर कांदा, कापूस या पिकांनाही फटका बसला आहे. गारपिटीमुळे द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले असून, केळी, मोसंबी, लिंबू इत्यादी बागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. प्रत्यक्षात मंत्रालया स्तरावरून पीक नुकसानीच्या लेखी सूचना मंगळवारी 28 रोजी जारी होण्याची अपेक्षा आहे . त्यानंतर पुढील आठ ते दहा दिवसात नुकसान झालेल्या पिकांच्या क्षेत्राचा नेमका आकडासमोर येईल , अशी माहिती कृषी विभागाचे संचालक विस्तार व प्रशिक्षण दिलीप शिंदे यांनी दिली ते म्हणाले की, नुकसानीच्या प्राथमिक माहितीनुसार अंदाजे 50 हजार हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. मंगळवारपासून पिकांच्या नुकसानीच्या आकडेवारी उपलब्ध होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर नुकसान क्षेत्राची नेमकी स्थिती समोर येईल राज्या मध्ये रब्बी हंगामात साठ लाख हेक्टर वर पेरण्या अपेक्षित असल्याचे ते म्हणाले स्थानिक स्तरावर महसूल व कृषी विभागाने पंचनाम्याची कामे हाती घेतले आहेत. पण अनेक क्षेत्रांमध्ये सध्या गुडघाभर पाणी कायम असल्याने पंचनामांना अडचण येत आहेत. एकूणच अवकाळी व गारपीटीने दिलेला तडाखा बघता नुकसानीचे आकडे वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.
पाच तालुक्यांना सर्वाधिक नुकसान
नाशिक जिल्ह्यात 890 गावांमधील 32 हजार 833 हेक्टर वरील पिके माती मोल झाली आहेत. निफाड, चांदवड, नांदगाव ,इगतपुरी व दिंडोरी या पाच तालुक्यांना सर्वाधिक तडाखा बसला आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी दोन दिवसात नुकसानीची पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
महसूल व कृषी विभागाने बांधावर जाऊन पंचनामे सुरू केले आहेत. द्राक्षपंढरी असलेल्या निफाड तालुक्यात अवकाळीने सर्वात जास्त नुकसान झाले असून 9,294 हेक्टर वरील द्राक्ष, मका, गहू ,कांदा ,ऊस तसेच भाजीपाला मातीमोल झाला आहे.
मराठवाड्यात जालना ,परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीची नोंद..
मराठवाड्यात रविवारी मध्यरात्री अचानक पावसाचा जोर वाढल्याने मुसळधार सरी कोसळण्यास सुरुवात झाल्याने विभागातील जालना 70.7 मिलिमीटर, परभणी 65 मिमी हिंगोली 65 मिमी ची म्हणजेच अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यासोबतच 107 मंडळांचा यात समावेश आहे. दरम्यान अतिवृष्टीमुळे कापसासह, सोयाबीन, मका ,गहू हरभऱ्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ठाण्याच्या मुरडबाड तालुक्यात भात जोडणी व मळणीवर पाणीच पाणी झाल्याने फार मोठे नुकसान झाले आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणचे ऊस भुई सपाट झाले असून ज्वारी व मळणीसाठी ठेवलेल्या भात पिकांचे नुकसान झाले असून नंदुरबार जिल्ह्यात कापूस, पपई, केळी सह इतर पिकांनाही फटका बसला आहे . धुळे च्या साक्री ,पिंपळनेर परिसरात सोयाबीन, मका, तांदूळ ,नागली मसूर ,भगर या पिकांचे देखील नुकसान झाले. चंद्रपूर जिल्ह्यात भात पिकांचे मोठे नुकसान झाले असून, अमरावती, अकोला ,बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, जिल्ह्यातही मोठे नुकसान झाले आहे.