Waghur : वाघूरमधील शेततळ्यांचा प्रयोग काय आहे? जाणून घ्या नवे मॉडेल…



Waghur : जळगाव जिल्ह्यात वाघूर उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत राज्यातील पहिल्या पथदर्शी शेततळे प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या प्रयोगांतर्गत २७ गावांमध्ये २०२० शेततळी बांधली जात असून, त्यात वाघूर धरणाचे पाणी साठवले जाणार आहे. हा उपक्रम परिसरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार असून, शाश्वत सिंचन सुविधेसह भू-जल पातळी सुधारण्यासही मोठी मदत करेल.

शाश्वत सिंचन आणि जलसंधारणाचे फायदे
या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना बारमाही पाणीपुरवठा उपलब्ध होईल. पारंपरिक तसेच आधुनिक सिंचन पद्धती (ठिबक आणि तुषार सिंचन) अधिक प्रभावीपणे वापरणे शक्य होणार आहे. पाण्याचा कार्यक्षम उपयोग केल्याने जलसंधारणाला मोठी चालना मिळेल.

उत्पादन वाढ आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती:
नियोजनबद्ध सिंचनामुळे शेतकरी वर्षभर विविध पिके घेऊ शकतील, परिणामी उत्पादन आणि उत्पन्न वाढेल. शेततळ्यांचा उपयोग मत्स्यपालनासाठी केल्यास शेतीपूरक व्यवसायांना चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्था अधिक सक्षम होईल.

दरम्यान प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग देण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जलसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत समन्वय बैठक घेण्यात आली. प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद बैठका आयोजित करून शेतकऱ्यांच्या शंका निरसन करण्यात आल्या.

विशेष म्हणजे गोंडखेल येथे सुरू झालेला हा प्रयोग केवळ जलसंधारणासाठी नसून, तो ग्रामीण भागातील शेतीसमृद्धीसाठी मोठे पाऊल आहे. या प्रकल्पामुळे शेतीसाठी आवश्यक जलसाठवण क्षमता वाढेल, भू-जल पातळी सुधारेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात येत असून, जळगाव जिल्ह्यातील हा उपक्रम राज्यातील इतर भागांसाठीही एक आदर्श ठरू शकतो.

वाघूर उपसा जलसिंचन योजनेचा विस्तार:
वाघूर उपसा जलसिंचन योजना क्र. १ आणि २ सध्या कार्यान्वित असून, या योजनेतून १९,१३२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
– गाडेगाव, जामनेर आणि गारखेडा या शाखांमधून १०,१०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
– २७ गावांमध्ये २,०२० शेततळी बांधण्याचे उद्दिष्ट असून, त्यापैकी २१० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत.
– गाडेगाव, नेरी बुद्रुक, नेरी दिगर, चिंचखेडा, करमाड व पळासखेडा येथे ७० शेततळ्यांमध्ये पाणी साठवण्यास सुरुवात झाली आहे.
– ९० टक्के पाइपलाइनचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम लवकरच पूर्ण होणार आहे.
– आतापर्यंत १,१८९ शेततळ्यांचे करारनामे पूर्ण झाले आहेत.

Leave a Reply