Wheat price: गव्हाच्या किंमती नियंत्रणात राहाव्यात यासाठी केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण विभागाने कालच विशेष आदेश काढून साठेमर्यादा घटवली होती. त्यामुळे निम्म्यापेक्षा कमी साठा ठेवता येणार असल्याने साठवण केलेला गहू बाजारात येऊन गव्हाच्या किंमती कमी होतील अशी केंद्राला अपेक्षा आहे.
दरम्यान या निर्णयानंतर बाजारात गव्हाच्या किंमती अजूनही फारशा पडल्या नसल्या तरी क्विंटल मागे १ ते २ रुपयांची घसरण झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येत आहे. शरबती गव्हाचे दर टिकून आहेत, मात्र लोकल गव्हाचे दर मात्र कमी होताना दिसत आहेत. या आठवड्यात राज्यातील प्रमुख धान्य बाजारात गव्हाची दररोज सरासरी १० हजार क्विंटल आवक होताना दिसत आहे. त्यातही सर्वाधिक आवक मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर बाजारात होताना दिसत आहे.
गुरुवार दिनांक १२ डिसेंबर रोजी मुंबईमध्ये लोकल गव्हाला किमान २८०० रुपये, तर सरासरी ४६०० रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव होता. शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर रोजी त्यात काहीशी घट होऊन सरासरी बाजारभाव ४४०० रुपये इतके झाले.
अर्थात शुक्रवारी गव्हाची आवक ८ हजार क्विंटल इतकी होती, म्हणजेच गुरूवारच्या तुलनेत जवळपास दुप्पट होती. त्याचाही परिणाम भावावर झाला असण्याची शक्यता आहे.
पुणे बाजारसमितीत गुरुवारी शरबती गव्हाला सरासरी ४४०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. तर शुक्रवारी त्यात वाढ होऊन ४५०० रुपये बाजारभाव मिळाला. शुक्रवारी सांगली बाजारात लोकल गव्हाला सरासरी ३२७० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला, तर गुरुवारी हाच भाव ४ हजार पर्यंत होता. म्हणजेच लोकल गव्हात सुमारे ८०० रुपयांनी दर कमी झाले.11:51 AM












