
Donald Trump America : दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली. मात्र शपथ घेताच अमेरिकेला प्राधान्य देण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ उडाली आहे. त्यामुळे मंगळवारी भारताच्या शेअर बाजारात मोठी खळबळ उडाली आणि सेन्सेक्स घसरला.
याचे कारण म्हणजे ब्रिक्स देशांसह अनेक देशांवर अमेरिकेने व्यापार कर लादण्याची घोषणा केली, हा व्यापार कर २५ ते १०० टक्के असू शकतो. त्याचा परिणाम भारतीय निर्यातीवर होऊ शकतो. विशेषत: शेती मालावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे देशातील शेतमालाच्या किंमती गडगडतील आणि त्याचा फटका थेट शेतकऱ्यांच्या मिळणाऱ्या बाजारभावावर होईल.
भारतातून कुठला शेतमाल निर्यात होतो?
अमेरिका खंडातील देशांमध्ये भारताने कृषी निर्यातीतून मागील वर्षात म्हणजेच एप्रिल २४ ते डिसेंबर २४ या काळात सुमारे २.२५ बिलियन डॉलर कमावले. त्यात सर्वाधिक वाटा मसाले आणि कडधान्यांचा होता. त्याखालोखाल तांदूळ, भाजीपाला आणि फळे, मांस व पोल्ट्री उत्पादने, चहा, कॉफी, तंबाखू, तेलबिया, खाद्यतेल, काजू, इतर कडधान्य यांचा समावेश होता. त्यातही अमेरिका हा क्रमांक एकचा आयातदार असून त्या खालोखाल कॅनडा आणि मेक्सिको या देशांचा क्रमांक लागतो.
ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिको या देशांना १ फेब्रुवारीपासून २५ टक्के व्यापार कर लावण्याचा निर्णय घेतला आहे तसेच चीन आणि भारताचा समावेश असलेल्या ब्रिक्स देशांनी जर डॉलर ऐवजी अन्य चलनात व्यवहार केले, तर त्यांना १०० टक्के व्यापारकर लावण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ आपल्याकडील शेतमाल आणि शेतमाल प्रक्रिया पदार्थांवर जर १०० टक्के कर लागला तर निर्यात पूर्णपणे थांबेल आणि त्याचा फटका काही प्रमाणात स्थानिक बाजारात बाजारभाव पडण्यावरही होऊ शकतात.