Onion export duty : कांदयासाठी आनंदाची बातमी? कांदा निर्यातशुल्क हटणार का? कितीने वाढणार भाव..

Onion export duty : मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कांद्याचे बाजारभाव तब्बल ४० टक्क्यांनी घसरले आहेत. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर कांदा उत्पादक प्रदेश असलेल्या राजस्थानमध्येही भाव घसरले आहेत. सध्या लासलगाव बाजाराचा विचार करायचा झाल्यास मागील आठवडयाच्या शेवटी ३४०० रुपये प्रति क्विंटल असलेले कांदा बाजारभाव आता १८०० ते १९०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

कांदा बाजारभाव घसरल्याने संतप्त शेतकऱ्यांनी नाशिक, सोलापूरसह विविध ठिकाणी लिलाव बंद पाडले आहेत. दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी कांद्याचे २० टक्के निर्यात शुल्क हटवावे अशी मागणी केली आहे.

श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयातशुल्क 20 टक्क्यांनी कमी करुन अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरु केले असल्याने नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशांमध्ये निर्यात करता यावा, कांद्याला खर्चावर आधारीत चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करणे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

राज्यातील आमदार सर्वश्री नितीन पवार, दिलीपराव बनकर, हिरामण खोसकर, सरोज अहिरे आदी लोकप्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून याप्रश्नी लक्ष घालून तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली होती. या लोकप्रतिनिधींच्या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केंद्रीय व्यापार मंत्री श्री. गोयल यांना पत्र लिहून कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.

निर्यात शुल्क पूर्णपणे काढून टाकले, तर देशातील कांद्याचे दर सुमारे २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्यातीलाही चालना मिळून येणाऱ्या काळात बाजारभाव टिकून राहण्याची शक्यता आहे. तसेच शेतकऱ्यांनी कांद्यावर अनुदान देण्याचीही मागणी केल्याचे समजते.

आज शुक्रवारी संसदेत राज्यातील विरोधी पक्षाचे खासदार निर्यातशुल्क रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील खासदारांनी या आठवड्याच्या सुरूवातीलाच कांदा बाजारभाव घसरण्याचा प्रश्न संसदेत मांडला होता. नगर जिल्ह्यातील खासदारांनीही त्याला साथ दिली होती.

दरम्यान कांदा निर्यात शुल्क सरकार कमी करणार का? याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून त्यानंतर भाव कितीने वाढतात किंवा स्थिरावतात हे समजणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *