Fisheries : मासेमारीसाठी शोधल्या कमी वापर झालेल्या जागा; मत्सउत्पादन वाढणार..

Fisheries

Fisheries : भारतीय मत्स्य सर्वेक्षणाच्या (FSI) च्या एका अभूतपूर्व खोल समुद्रातील मासेमारी मोहिमेने अरबी समुद्रात अनेक अत्यंत उत्पादक, संभाव्यतः आजवर वापरली गेली नाहीत अशी मासेमारी क्षेत्रे शोधली आहेत. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) योजनेद्वारे मिळालेल्या निधीतून ही मोहीम राबविण्यात आली होती. भारताच्या मासेमारी उद्योगाचा विस्तार करण्यासाठी आणि भविष्यातील अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दिशेने हा शोध एक महत्त्वपूर्ण पाऊल समजले जात आहे.

मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ‘भारतीय मत्स्य सर्वेक्षण’ या देशातील प्रमुख मत्स्य संशोधन संस्थेने ट्रॉलरद्वारे हे सर्वेक्षण केले. सर्वेक्षण करणारी ही बोट समुद्रात 300 ते 540 मीटर खोलीवर दिवसरात्र कार्यरत होती. या मोहिमेत केरळमधील कोल्लम ते गोव्यापर्यंतच्या एका मोठ्या प्रदेशाचे सर्वेक्षण करण्यात आले.

भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून सुमारे 100-120 नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या या नुकत्याच शोधलेल्या जागांवर 150-300 किलो प्रती तास या सरासरी कॅच पर युनिट एफर्ट (CPUE) इतके प्रभावी मासे पकडले गेले. चित्तवेधक गोष्ट म्हणजे, या सर्वेक्षणात दिवसा आणि रात्रीच्यावेळी केलेल्या मासेमारीत सापडलेल्या माश्यांचे प्रमाण किंवा माशांच्या प्रजातींच्या विविधतेत कोणताही महत्त्वपूर्ण फरक आढळला नाही. हे क्षेत्र विविध प्रकारच्या व्यावसायिकदृष्ट्या मौल्यवान क्रस्टेशियन्सने (कठीण कवचाचे जलचर) समृद्ध असून यात हंपबॅक, नायलॉन कोळंबी, अरेबियन रेड कोळंबी, खोल समुद्रातील स्पाईनी कोळंबी, खोल पाण्यातील काटेरी लॉबस्टर आणि खोल समुद्रातील स्क्वॅट लॉबस्टर यांचा समावेश आहे. या क्षेत्रात ओपिस्टोटोथिसस्प आणि ऑक्टोपोटेथिसिक्युला या सारखे सेफॅलोपॉड देखील मुबलक प्रमाणात सापडली.

शिवाय, या नव्याने सापडलेल्या क्षेत्राने माशांच्या विविध प्रजातींना रहिवास प्रदान केला आहे.फ्रॉगहेड ईल, रोझी कॉड, सॅकफिश, स्नेक मॅकरेल, रॉयल एस्कॉलर, मायक्टिओफिड्स, बँडफिश, डकबिल फ्लॅटहेड, स्प्लेंडिड अल्फोन्सिनो, शॅडो ड्रिफ्टफिश, स्पायनीजॉग्रीनआय, शॉर्टफिनिओस्कोप्लिड आणि स्टारगेझर्स या त्यापैकी प्रमुख प्रजाती आहेत.सिकलेफिन चिमेरा, पिग्मी रिबनटेलकॅटशार्क, ब्रॅम्बल शार्क, इंडियन स्वेलशार्क आणि त्रावणकोर स्केट यासारख्या एलास्मोब्रँच श्रेणीतील मासे देखील येथे मोठ्या संख्येने आढळले होते.

“हा महत्त्वपूर्ण शोध म्हणजे खोल समुद्रातील मासेमारी संसाधनांचा शोध घेण्यासाठी भारतीय मत्स्य सर्वेक्षणाच्या समर्पणाचे प्रदर्शन आहे,” असे भारतीय मत्स्य सर्वेक्षणाचे महासंचालक डॉ. श्रीनाथ के. आर. म्हणाले. “आमचे संशोधन सागरी परिसंस्थेची शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी आणि भारताच्या मासेमारी उद्योगाला बळकटी देण्यासाठी वैज्ञानिक समज वाढवेल, आणि यातूनच मच्छिमारांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनात योगदान मिळेल,” असे ते म्हणाले.

भारतीय मत्स्य सर्वेक्षणाच्या मुरगाव तळाचे विभागीय संचालक डॉ. एस. रामचंद्रन यांनी किनारी मत्स्यव्यवसायावरील वाढत्या भाराच्या पार्श्वभूमीवर या शोधाचे महत्त्व अधोरेखित केले. “किनारी मत्स्यव्यवसाय संसाधन क्षेत्रात अति मासेमारी, अधिवासाचा ऱ्हास आणि हवामान बदलाचा वाढता ताण दिसून येत आहे. देशात मत्स्यव्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी खोल समुद्रातील संसाधने एक महत्त्वाचा पर्याय म्हणून उदयास येत आहेत,” असे ते म्हणाले.

भारतीय मत्स्य सर्वेक्षणाच्या समर्पित शास्त्रज्ञांच्या पथकाने ज्यामध्ये डॉ. नशाद एम; शिवा ए; आशिक पी; वेंकटेश सरोज आणि मुख्य अभियंता जोसेफ इग्नेशियस यांच्यासह डॉ. एच. डी. प्रदीप; डॉ. एम. के. सिन्हा आणि राजू एस. नागपुरे या गोवा तळावरील पथकाने या मोहिमेच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली.

या खोल समुद्रातील परिसंस्थांच्या क्षमतेचे अधिक मूल्यांकन करण्यासाठी खोल समुद्रातील मत्स्यसंपत्तीचे संशोधन आणि शोध सर्वेक्षण सुरूच राहणार आहे. माशांच्या संख्येचे मूल्यांकन, जटिल सागरी पर्यावरण समजून घेणे आणि या नव्याने शोधलेल्या मासेमारीच्या क्षेत्रासाठी शाश्वत व्यवस्थापन धोरणे विकसित करण्यावर भविष्यातील संशोधन केंद्रित असेल.

Leave a Reply