Shrimp prices : अमेरिकेने झिंगा माशावर लावलेला नवीन आयात कर भारतीय झिंगा मासेमारी उद्योगावर मोठा आर्थिक फटका ठरत आहे. या निर्णयामुळे झिंग्याच्या निर्यातीला मोठा झटका बसला असून उत्पादन केंद्रांवर झिंग्याचे दर प्रचंड कोसळले आहेत. काही दिवसांपूर्वी ५० नग झिंगा ३५० रुपये प्रति किलो दराने विकला जात होता, तोच आता केवळ ७० रुपये किलो दराने मिळत आहे.
झिंगा मासा सामान्यतः “नग” प्रमाणे विकला जातो. उदाहरणार्थ, ५० नग म्हणजे एका किलोमध्ये सुमारे ५० झिंगा, प्रत्येकी अंदाजे २० ग्रॅम. वन्नामेई जातीचा हा झिंगा मासा भारतातून अमेरिकेला सर्वाधिक प्रमाणात निर्यात केला जातो.
अमेरिकेच्या आयात कर वाढीमुळे निर्यातदारांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे झिंगा प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांनी खरेदी थांबवली असून, त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर झाला आहे. बहुतांश झिंगा शेती आंध्र प्रदेशमध्ये केली जाते. एका हेक्टरवर झिंगा उत्पादनासाठी शेतकरी सुमारे १ लाख रुपये गुंतवणूक करतात.
उन्हाळा हा झिंगा उत्पादनाचा सर्वात महत्त्वाचा हंगाम असून सध्या झिंगा मोठ्या प्रमाणावर तयार झाला आहे. मात्र दर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांचा माल विकला जात नाही आणि आर्थिक नुकसान वाढत आहे.
झिंगा दरातील घसरणीमुळे आणि निर्यात थांबल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यांचा माल तलावात अडकलेला असून खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करून आयात करासंदर्भात अमेरिकेसोबत चर्चेतून मार्ग काढावा, अशी मागणी होत आहे.












