summer onions : उन्हाळी कांद्याची आवक वाढतेय, आठवडाभरात कांदा कितीने घसरला?

summer onions : राज्यात ७ एप्रिल ते ११ एप्रिल या कालावधीत कांद्याची एकूण आवक १२ लाख ८८ हजार ७३८ क्विंटल झाली असून त्यात उन्हाळी कांदा सर्वाधिक म्हणजे १० लाख ३४ हजार १२० क्विंटल होता. याच कालावधीत लाल कांद्याची एकूण आवक २ लाख ४६ हजार ५२९ क्विंटल होती. पांढऱ्या कांद्याची आवक ८९ क्विंटल इतकी नोंदली गेली. लाल कांदा हंगाम आता अंतिम टप्प्यावर आहे.

या काळात उन्हाळी कांद्याची सर्वाधिक आवक झालेल्या जिल्ह्यांमध्ये नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि बीड हे जिल्हे आघाडीवर होते. दरम्यान मागच्या आठड्यात सुरूवातीला स्थिरावलेले बाजारभाव आता या आठवड्यात घसरले असून काही ठिकाणी तर कांद्याचे सरासरी बाजारभाव एक हजाराच्याही खाली घसरले आहेत.

नाशिक जिल्ह्यात अशी झाली आवक:
– ७ एप्रिल रोजी नाशिकमध्ये उन्हाळी कांद्याची आवक १,७२,६३२ क्विंटल होती. सरासरी बाजारभाव १,२३७ रुपये होता.
– ८ एप्रिलला आवक १,७५,०५८ क्विंटल आणि दर १,२११ रुपये इतका होता.
– ९ एप्रिल रोजी आवक १,८७,३६८ क्विंटल झाली, दर १,२०१ रुपये.
– १० एप्रिलला ही आवक १८,५३१ क्विंटलपर्यंत घसरली, दर १,१८६ रुपये.
– ११ एप्रिल रोजी आवक आणखी कमी होऊन ९९,९६१ क्विंटलवर आली, आणि सरासरी दरही घसरून १,११७ रुपयांवर पोहोचला.

दरम्यान दिनांक ७ एप्रिलच्या तुलनेत ११ एप्रिल रोजी नाशिकमध्ये कांद्याच्या सरासरी बाजारभावात १२० रुपयांची घट झाली. ही घसरण वाढलेल्या आवक व देशांतर्गत साठ्यामुळे झाली असल्याचे जाणकार सांगतात.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा काळ चिंतेचा आहे, कारण उत्पादन भरघोस असतानाही दर घसरत आहेत. शासनाने हस्तक्षेप करून निर्यातीस चालना दिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.