Animals heatstroke symptoms : सावधान ! तुमच्या जनावरांमध्ये उष्माघाताची ही लक्षणे तर दिसत नाहीत ना ?

Animals heatstroke symptoms

Animals heatstroke symptoms : राज्यात उन्हाची तीव्रता वाढत असताना आता जनावरांवरही उष्माघाताचे संकट गडद होत आहे. एप्रिल महिन्यात तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असल्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. उष्माघात म्हणजे शरीरातील तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होणे. यामुळे जनावरांचे आरोग्य झपाट्याने बिघडते. योग्य वेळी लक्ष न दिल्यास जीवावर बेतण्याचीही शक्यता असते.

उष्माघात झालेल्या जनावरांमध्ये काही खास लक्षणे दिसून येतात. जसे की शरीर तापणे (१०४ ते १०६° फॅ. पर्यंत), कातडी कोरडी होणे, डोळे लालसर होणे व डोळ्यातून पाणी येणे, श्वसनाचा वेग वाढणे, लघवी कमी होणे, अन्न व पाण्याकडे दुर्लक्ष करणे आणि काही वेळाने जनावर बसून राहणे. काही वेळा गाभण जनावरांमध्ये गर्भपात होण्याची शक्यता तर काही वेळा संकरित जनावरांमध्ये रक्तस्राव देखील होतो.

उपचाराच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनावरांना तातडीने सावलीत हलवावे आणि थंड पाण्याने अंग धुवून काढावे. दोन्ही पायांच्या मध्ये ओले कापड ठेवून त्यावर सतत थंड पाणी टाकावे. थंड व स्वच्छ पाणी दिवसातून ३–४ वेळा पाजावे. पचनास हलके गूळ मिसळलेले खाद्य द्यावे. उष्माघातावर कोणतीही जुलाबाची औषधे उपयोगी ठरत नाहीत, त्यामुळे लक्षणे दिसताच पशुवैद्यकाची तातडीने मदत घ्यावी.

उन्हाळ्यात एकाच गोठ्यात अनेक जनावरांना एकत्र ठेवणे, सिमेंटच्या पत्र्यांची छत असलेले बंद गोठे, पाण्याची कमतरता ही उष्माघाताला कारणीभूत ठरतात. त्यामुळे ऊसाचे पाचट, गवत किंवा इतर थंड पदार्थाने गोठे झाकणे, मोकळ्या जागेत सावली निर्माण करणे, आणि स्वच्छ व थंड पाणी २४ तास उपलब्ध ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

जनावरांची काळजी घेणे म्हणजेच शेतकऱ्याचे भविष्य सुरक्षित करणे. उन्हाळ्यात थोडी जास्त काळजी घेतल्यास जनावरांचे आरोग्य टिकवता येते आणि दुग्ध व्यवसायाचे नुकसान टाळता येते.