Heat wave : महाराष्ट्रासह देशातील विविध भागांत मागील २४ तासांत तापमानात चढ-उतार दिसून आले. विदर्भ आणि मराठवाड्यात दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा थोडे अधिक असून हवामान उष्ण आणि दमट राहिले आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही भागांत उष्णतेची लाट जाणवत आहे. तर देशाच्या ईशान्य भागात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.
मागील २४ तासांत महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान अकोला येथे ४२.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हे तापमान राज्यातील सर्वात जास्त होते. तर सर्वात कमी तापमान नाशिकमध्ये ३५.६ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. औरंगाबादमध्ये ३८.४, नांदेडमध्ये ३८.६, परभणीत ३८.२, नागपूरमध्ये ४०.२, चंद्रपूरमध्ये ४१.५ आणि जळगावमध्ये ४० अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदले गेले. या सर्व आकड्यांवरून विदर्भ आणि मराठवाडा भागात उन्हाचा तीव्र त्रास जाणवत असल्याचे दिसते.
दरम्यान गेल्या २४ तासांत प. बंगाल, सिक्कीम, बिहार, ओडिशा, झारखंड, ईशान्य राज्ये (असम, मेघालय, नागालँड, त्रिपुरा) तसेच अंदमान निकोबार बेटांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. विशेषतः शांतिनिकेतन (बंगाल) येथे ६ सें.मी. तर उडगमंडलम (तमिळनाडू) येथे ३ सें.मी. इतका पाऊस पडला.
येणाऱ्या ३-४ दिवसांत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हवामान उष्ण व दमट राहील. विदर्भात २१ व २२ एप्रिलला काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशात देखील उष्णतेची लाट कायम राहील. ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या पर्वतीय भागांमध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडेल. बिहार, झारखंड आणि ओडिशा येथे वादळी वाऱ्यांसह वीज पडण्याची शक्यता आहे.
सध्या देशात हवामानातील बदलाचे प्रमुख कारण म्हणजे वेगवेगळ्या भागांतील चक्रीय वारे (cyclonic circulations) आणि पश्चिमी झंझावात (western disturbance) आहेत. पंजाब, उत्तर प्रदेश, झारखंड ते आसाम आणि मध्य महाराष्ट्र ते तमिळनाडूपर्यंत अनेक ठिकाणी हवामान दाबरेषा (troughs) सक्रिय आहेत. यामुळेच काही भागात पावसाचे वातावरण आहे, तर काही भागात उष्णतेची तीव्रता वाढत आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी गारपिटीपासून बचावासाठी जाळी किंवा ताडपत्रीचा वापर करावा, तर उष्णतेच्या लाटांपासून बचावासाठी संध्याकाळी हलकं पाणी देण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.












