
Crop insurance : महाराष्ट्र शासनाने २०२३ मध्ये सुरू केलेली ‘एक रुपयात पीक विमा योजना’ येत्या खरीप हंगामापासून गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना अतिशय अल्प खर्चात म्हणजे केवळ एका रुपयात पीक विम्याचे संरक्षण देणारी ही योजना जरी लोकप्रिय ठरली असली, तरी तिच्यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शासनाने योजनेला तात्पुरती विश्रांती देऊन नव्या स्वरूपात आणण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जे शेतकरी प्रामाणिक आहेत, त्याच्यासाठी ही त्रासदायक बाब असून केवळ निवडणुकीच्या काळातच मते मिळविण्यासाठी ही योजना सुरू केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शासनाच्या अहवालानुसार, अनेक ठिकाणी शासकीय जमिनी, देवस्थानांची जागा, गायरान आणि डोंगराळ जमीन या योजनेच्या अंतर्गत दाखवून खोटे अर्ज सादर करण्यात आले. इतकेच नव्हे, तर राज्याबाहेरील शेतकऱ्यांनीसुद्धा आधार कार्डाच्या आधारे अर्ज भरून योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीवर मोठा भार पडला आणि खरे शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली.
ही बाब लक्षात घेता शासनाने ही योजना बंद करण्याचा आणि नव्या सुधारित योजनेची आखणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कृषीमंत्री कोकाटे यांनी स्पष्ट केले आहे की ही योजना पूर्णतः बंद केली जाणार नाही, तर गैरप्रकार टाळण्यासाठी नव्या अटी व निकषांसह पुन्हा राबवली जाईल.
सध्याच्या प्रस्तावानुसार, नव्या योजनेत शेतकऱ्यांना हेक्टरी सुमारे १२०० रुपयांपर्यंत हप्ता भरावा लागू शकतो. विमा संरक्षण पूर्वीप्रमाणे राहील, मात्र अर्जदाराची जमीन सातबारा, आधार, मोबाईल व बँक खात्याशी जोडलेली असेल, अशी अट घालण्यात येणार आहे. तसेच, केवळ खरी शेतकरीच पात्र असतील, याची खातरजमा करण्यासाठी महसूल आणि कृषी विभाग यांच्यात समन्वय ठेवण्यात येईल.
या योजनेतून खरिपातील नुकसानग्रस्त पिकांना संरक्षण देणे, शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळवून देणे आणि शेतीतील जोखीम कमी करणे हे शासनाचे उद्दिष्ट कायम राहील. मात्र, त्यासाठी अधिक पारदर्शकता आणि डिजिटल पडताळणी प्रक्रिया राबवण्यात येईल.
राज्यातील लाखो शेतकरी या योजनेवर अवलंबून आहेत. त्यामुळे नवीन योजना अंतिम होईपर्यंत शासनाने शेतकऱ्यांना गोंधळात न टाकता योग्य माहिती वेळेवर पुरवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनीही सतर्क राहून, खोट्या दलालांपासून सावधगिरी बाळगून अधिकृत माहितीच्या आधारे अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.