AI technology : शेतीत एआयची क्रांती,महाराष्ट्राला अन्नधान्य निर्यातीत जागतिक आघाडी मिळवून देणार…

AI technology : महाराष्ट्राने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) योग्य वापर केल्यास अन्नधान्य उत्पादन आणि निर्यातीच्या क्षेत्रात तो जगातील आदर्श राज्य बनू शकतो, असा ठाम विश्वास निती आयोगाच्या फेलो आणि नॅसकॉमच्या माजी अध्यक्षा देबजानी घोष यांनी व्यक्त केला. मंत्रालयात ‘टेक वारी – महा तंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह’ अंतर्गत आयोजित ‘विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर तंत्रज्ञान’ या विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त आर. विमला आणि मंत्रालयातील अनेक अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. घोष यांनी सांगितले की, जग अन्नधान्याच्या तुटवड्याच्या संकटाला सामोरे जात असताना महाराष्ट्राकडे शेतीतील कौशल्य, आधुनिक साधने, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि नव्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची क्षमता आहे. हे सगळे एकत्रितपणे वापरल्यास राज्य अन्नधान्याच्या जागतिक निर्यातीत आघाडी गाठू शकते.

त्यांनी यावेळी कृषी क्षेत्रातील नव्या शक्यतांवरही प्रकाश टाकला. सुधारित बियाण्यांचा वापर, ड्रोनद्वारे पिकांचे निरीक्षण, अचूक सिंचन व्यवस्था आणि उत्पादनक्षम तंत्रज्ञान यांच्या साहाय्याने शेती क्षेत्रात मूलभूत बदल घडवता येऊ शकतात. २०२० ते २०३० हे दशक कृत्रिम बुद्धिमत्तेचे असून, याच माध्यमातून कृषी, आरोग्य, ऊर्जा आणि उत्पादन क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

देबजानी घोष यांनी बायोटेक म्हणजे जीवशास्त्र आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा संगम असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, महाराष्ट्राच्या प्रगतीचा खरा आधार आयआयटी मुंबईसारख्या शिक्षणसंस्था, स्टार्टअप संस्कृती, उद्योगधंदे, डिजिटल अर्थव्यवस्था, हरित उर्जा आणि दूरदृष्टीचे धोरणे आहेत. यामुळेच राज्य देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात मोठा वाटा उचलण्याची क्षमता ठेवते.

कार्यक्रमात बोलताना आर. विमला यांनीही विज्ञान, एआय आणि इतर प्रगत तंत्रज्ञानांच्या समन्वयाने उद्योग व कृषी क्षेत्रासाठी ठोस योजना आखण्यावर भर दिला. फक्त तंत्रज्ञान उपलब्ध असून उपयोग नाही, तर त्याची अचूक अंमलबजावणी होणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.