अवघ्या काही दिवसांवर आताचा खरीप हंगाम येऊन ठेपला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची मशागतीसाठी आणि बियाणे खरेदीसाठी तयारी सुरु झाली आहे. सध्या चांगल्या कापूस बियाण्यांच्या शोधात अनेक शेतकरी बांधव असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र , यात शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची जास्त शक्यता आहे. कारण बनावट बियाणांचा सुळसुळाट ऐन हंगामाच्या तोंडावर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बियाणे खरेदी करताना खबरदारी घेतली नाही तर शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे कापूस बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे .
दरवर्षी शेजारील राज्यांमधून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट बियाणे येतात . विशेष बाब म्हणजे मध्यवर्ती भाग असल्याने प्रशासनाला त्यावर नियंत्रण मिळवणे देखील कठीण जाते. मागील महिन्यामध्ये अर्थात एप्रिल महिन्यातच महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने अहेरी येथे छापा टाकून १८ लाख रुपयांचे बनावट कापूस बियाणे पकडले होते. आता, येत्या खरीप हंगामात बियाणे खरेदी करताना बॅच क्रमांक पाहून बियाणे खरेदी करावी . शेतकऱ्याने पक्के बिल न घेतल्यास नुकसान होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी दरम्यान वरील बाबीची काळजी घ्यावी, असे देखील कृषी विभागाने सांगितले आहे.
बनावट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारणाऱ्या टोळ्या यावर्षी एप्रिल महिन्यापासूनच सक्रिय झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. फसवणूक होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी खरेदी करताना बियाण्याची गुणवत्ता व कंपनीबाबतची विश्वासार्हता या बाबी तपासणे अगदी आवश्यक आहे. तसेच, कोणी बनावट बियाणे विक्री करत असताना आढळल्यास तत्काळ याची कृषी विभागाला माहिती द्यावी. तसेच संबंधित तक्रारदार शेतकऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन देखील कृषी विभागातर्फे केले आहे . बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी गुणवत्तेबाबत तडजोड करु नये व फसवणूक झाल्यास वेळ न घालवता तक्रार करावी, असे आवाहनही विभागाने केले आहे.












