Devendra Fadanvis : खोट्या कागदपत्रांच्या आधारे कमी किंमतीतील सरकारी सदनिका लाटून फसवणूक केल्याप्रकरणी कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार आमदारकीसह कोकाटे यांचे मंत्रीपदही धोक्यात आले आहे. मात्र नैतिकतेच्या मुद्यावर त्यांनी राजीनामा दिला नसून ते आपल्या पदाला चिकटून राहिले आहेत.
या विरोधात मंत्री कोकाटी यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेऊन स्थगितीसाठी अर्ज केला असून १ मार्च २५ रोजी या प्रकरणी निकाल दिला जाणार आहे. तो पर्यंत त्यांना १ लाख रुपयांचा जामिन मंजूर झाला असून निकाल लागेपर्यंत तरी आणखी दोन दिवस त्यांची आमदारकी टिकून राहिल. निकाल विरोधात गेल्यास त्यांना सर्वच पदे सोडावी लागणार आहेत.
दरम्यान या प्रकरणात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्टिव्ह मोडमध्ये आले असून दोनच दिवसांपूर्वी त्यांनी पीए-ओएसडी संदर्भातील कोकाटे यांच्या वक्तव्याला जोरदार उत्तर दिले होते. तसेच पीएम किसानच्या १९ व्या हप्ता वितरण समारंभात त्यांच्यासमवेत राज्यमंत्री जयस्वाल नागपूरात होते. तेव्हापासूनच चर्चेला उधाण आले होते. दरम्यान काल मंत्रालयात कृषीमंत्र्यांऐवजी कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सूचना दिल्याने मंत्री कोकाटे यांचा पत्ता बहुतेक लवकरच कापला जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तविण्यात येत आहे.












