कांदा चाळीनुसार आता बेदाणाचाळीला अनुदानाच्या कक्षेत आणण्याची द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची मागणी राज्य शासनाने स्वीकारली आहे. त्यामुळे यापुढे बेदाणा चाळीला १० लाखांपर्यंत चे अनुदान मिळणार आहे अशी महत्वाची माहिती फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी दिली.
पुण्याच्या हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल येथे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाने आयोजित केलेल्या तीन दिवसीय (ता.२४ ते २६) द्राक्ष परिषदेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर बागाईतदार संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पवार, उपाध्यक्ष कैलास भोसले, खजिनदार सुनील पवार, माजी अध्यक्ष सुभाष आर्वे, अखिल भारतीय द्राक्ष संघटनेचे उपाध्यक्ष अनिल मेहेर, द्राक्ष संघाच्या संशोधन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. जी. एस. प्रकाश, फलोत्पादन संघाचे संचालक भीमसेन कोकरे, कर्नाटक द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष कृष्णा मुंबा रेड्डी, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे (एनआरसीजी) संचालक डॉ. कौशिक बॅनर्जी ,अखिल भारतीय फलोत्पादन संघाचे अध्यक्ष सोपान कांचन, होते.
‘‘बागाईतदार संघाने बेदाणा चाळीसाठी सतत पाठपुरावा केला होता.असे डॉ. मोते म्हणाले, त्यामुळे आता बेदाणा चाळीच्या उभारणीच्या तांत्रिक कामाकरिता कमाल ६० टक्के, तसेच बांधकामासाठी ४० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.फलोत्पादन विभागाकडून भविष्यात ‘ग्रेपनेट’च्या धर्तीवर स्वतंत्रपणे ‘रेझिननेट’ सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अतिशय नाजूक द्राक्ष शेती असताना देखील शेतकऱ्यांनी साडेतीन लाख टनांच्या पुढे निर्यात नेली आहे. मात्र त्यावर समाधान न मानता आयातीसाठी नव्या बाजारपेठा शोधाव्या लागतील. द्राक्षची गुणवत्ता व उत्पादकता वाढविणे ,नव्या वाणांचा अवलंब करणे, ही आव्हाने द्राक्ष शेतीसमोर आहेत.’’
, राज्यातील द्राक्ष बागा आता साडेचार लाख एकरवर विस्तारल्या असून, द्राक्ष संघाची सभासद संख्या ३३ हजारांवर पोहोचल्याचे द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पवार यांनी नमूद केले.‘‘पाणी, माती, देठ, पान परीक्षणानंतरच शेतकऱ्यांनी द्राक्ष शेतीचे नियोजन करायला पाहिजे . जागतिक बाजारपेठेची आव्हाने विचारात घेत संघाकडून नव्या वाणांसाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे.’’
द्राक्ष संघाची वाटचाल सोपान कांचन यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले, केंद्रीय कृषिमंत्री ‘‘बलराम जाखड असताना महाराष्ट्राची द्राक्ष केवळ दिल्लीच्या बाजारात जात होती. एकदा आम्हाला जाखड यांनी दिल्लीत बोलावून घेतले.तुमच्या द्राक्षमध्ये गुणवत्ता नाही . त्यामुळे दिल्लीची बाजारपेठ महाराष्ट्राच्या द्राक्षासाठी बंद केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. त्यांचे म्हणणे बरोबर होते. त्यामुळे आम्ही सारे एकत्र आलो व विदेशातील तज्ज्ञांकडून सल्ला घेऊ लागलो. महाग्रेपची स्थापना केली. त्यामुळे निर्यातीचा पाया रोवण्यास मदत झाली.
‘एनआरसीजी’ संचालक डॉ. बॅनर्जी म्हणाले,कि मी द्राक्ष संशोधन केंद्रात १९९७ पासून कार्यरत आहे. तांत्रिक चर्चासत्र दर वर्षी घेणारा द्राक्ष संघ हा देशात एकमेव शेतकरी संघ आहे. निर्यात, कीड-रोग , हवामान बदल, सर्व समस्या विचारात घेत ‘एनआरसी’मध्ये वाण विकास कार्यक्रम राबवत आहोत. आम्ही ३ वाण विकसित केले आहे. आम्ही निर्यात वाढीसाठी उर्वरित अंश (रेसिड्यू) समस्येचा बारकाईने अभ्यास करीत आहोत. शेतकऱ्यांनी ‘गुड अॅग्रिकल्चर प्रॅक्टिसेस’अर्थात कष्टपूर्वक ‘गॅप’, चा केलेला विस्तार कौतुकास्पद आहे.
केंद्र सरकारकडून समाज माध्यमावर द्राक्ष वाणाबाबत छोटे-छोटे व्हिडीओ टाकण्यात येतात . तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही केले जाते . त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो . आम्ही संशोधन करतो परंतु , ते पीक घेऊन शेतकरी चांगल्या प्रकारे उत्पादन करतो. शेतकरी हा खरा ‘चॅम्पियन’ आहे. नवीन संशोधन, नवीन तंत्रज्ञान, वाणाचा दर्जा,यांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.असे डॉ. कौशिक बॅनर्जी म्हणाले,
या वेळी ‘द्राक्ष वृत्त स्मरणिका’ व ‘द्राक्ष संहिता’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. द्राक्ष परिषदेत कृषी खात्याचे माजी उपसंचालक कै. गोविंद हांडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. द्राक्ष बागाईतदार संघाने नव्याने सुरू केलेल्या आरोहण या संगणकीय व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात आले.