
Kisan credit card : किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून विनातारण कर्ज मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना लाभ होत असतो. सध्या लाखो शेतकरी, बटाईदार, मत्स्य व्यावसायिक किसान क्रेडिट कार्डचा वापर करत आहेत.
शेती करताना शेतकऱ्यांना सर्वात मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो, तो म्हणजे खेळते भांडवल. अनेकदा पेरणीसाठी किंवा बियाणांसाठी त्यांच्याकडे वेळेवर पैसे उपलब्ध नसतात. अशा वेळेस त्यांना खासगी सावकारांचा रस्ता पकडावा लागतो, पण अनेक खासगी सावकरांची छळ केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या होत्या. त्यावर उपाय म्हणून सन ९८ पासून किसान क्रेडिट कार्डची योजना सरकारने सुरू केली.
या कार्डच्या माध्यातून विनातारण कर्ज घेता येते, तसेच छोट्या छोट्या गोष्टींसाठी, अगदी वैयक्तिक कामासाठीही शेतकऱ्यांना या कार्डचा उपयोग होत आहे. सध्या या कार्डची मर्यादा ३ लाख रुपयांची आहे. म्हणजेच वर्षभरात शेतकऱ्याला सुमारे ३ लाख रुपये विनातारण कर्ज काढता येते. त्यासाठी सरकार शेतकऱ्याला ९ टक्के व्याजदर लावत असले, तरी त्यात २ टक्के सूट मिळते. तसेच वेळेत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना आणखी ३ टक्के सवलत दिली जाते म्हणजेच एकूण केवळ ४ टक्के व्याजावर किसान क्रेडिट कार्डचे पैसे वापरता येतात. सध्या या कर्जाची मर्यादा वाढवून ८.३ लाख कोटी केलेली आहे. त्याचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांना होणार आहे.
मोठी बातमी
दरम्यान किसान कार्ड्संदर्भात आता एक मोठी बातमी समोर येत आहे. लवकरच होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात एक बदल होऊ शकतो. हा बदल म्हणजे किसान क्रेडिट कार्डवर कर्जमर्यादा वाढण्याची शक्यता आहे. सध्याच्या तीन लाख रुपयांवरून ही कर्जमर्यादा पाच लाखांपर्यंत होण्याची शक्यता सरकारमधील सूत्रांनी वर्तविली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६साठी ही योजना लागू होऊ शकते. अर्थात बजेट मध्ये काय तरतुदी होतील ते लवकरच पुढील महिन्यात कळणार आहे.