
poultry farming:हिवाळ्यात बऱ्याच वेळेस पिण्याच्या पाण्याचे तापमान कमी असल्यामुळे कोंबड्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण घटते. कोंबड्यांच्या खाद्य सेवनाच्या प्रमाणात पाणी पिण्याचे प्रमाण असणे आवश्यक आहे. साधारणतः योग्य तापमानात कोंबड्या खाद्याच्या दुप्पट पाणी पितात.
परंतु हे पाणी पिण्याचे प्रमाण घटल्यास मूत्रपिंडात युरिक अॅसिडचे घनीकरण होते आणि असे युरिक अॅसिड मूत्रपिंड आणि मूत्रवाहिनीमध्ये साठून राहते. कोंबड्यांना गाऊट होतो, त्यांचा मृत्यू होतो. पाणी कमी प्यायल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी (डिहायड्रेशन) होते.
म्हणून हिवाळ्यामध्ये कोंबड्यांना कोमट पाणी द्यावे. त्यामुळे कोंबड्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण वाढेल. एक लहान ड्रिंकर प्रती ४० पिल्लांना तर एक मोठा ड्रिंकर प्रति ३० मोठ्या कोंबड्यांसाठी वापरावा. ड्रिंकरची उंची कोंबडीच्या पाठीच्या दोन इंच वर असावी. कोंबड्यांना नेहमी स्वच्छ व निर्जंतुक पाणी द्यावे. मुबलक प्रमाणात पाणी मिळेल अशी व्यवस्था करावी. असा सल्ला महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.