
सोयाबीनच्या हमीभाव खरेदीची मुदत वाढविल्यानंतरही राज्यातील बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनचे बाजारभाव पडलेलेच दिसून येत आहेत. हमीभाव खरेदीमध्ये अनेक अडचणी असून सरकारी लक्ष्य पूर्ण होईल का याची शंका शेतकऱ्यांना आहे. तर दुसरीकडे याचा अंदाज आल्याने खुल्या बाजारातील व्यापाऱ्यांनी कमी भावानेच खरेदी करण्याचे धोरण स्वीकारल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
रविवारी लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीला कमीत कमी ३७६९ आणि सरासरी ३९०५ असा बाजारभाव मिळाला. मागच्या आठवडया्च्या तुलनेत लातूर बाजारातील सोयाबीनचे बाजारभाव घसरल्याचे दिसून येत आहे. दरम्यान रविवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी अमरावतीत सोयाबीनला ३८५५ रुपये, अहिल्यानगरला ३९०० रुपये तर छत्रपती संभाजीनगरला ४ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले.
आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शनिवारी दिनांक १ फेब्रुवारी रोजी पिवळ्या सोयाबीनला लातूर बाजारात ३९६१ रुपये सरासरी, तर पांढऱ्या सोयाबीनला ४१०० रुपये प्रति क्विंटल सरासरी बाजारभाव मिळाला.
राज्यात 562 खरेदी केंद्रे..
खरेदी केंद्रावर 30 जानेवारीपर्यंत 4 लाख 37 हजार 495 शेतकऱ्यांकडून 9 लाख 42 हजार 397 मेट्रिक टनापेक्षा अधिक सोयाबीनची खरेदी झाली आहे. 6 फेब्रुवारीपर्यंत या आकड्यात मोठी वाढ होऊन समाधानकारक खरेदी होणार आहे. अनेक जिल्ह्यांनी आपले उद्दिष्ट पूर्ण केले आहे तर काही जिल्ह्यांना उद्दिष्ट वाढवून दिले आहे. राज्य सरकारच्या मागणीनुसार केंद्र सरकारने 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. असे असले तरी त्याचा फायदा लोकल बाजारातील सोयाबीनला होताना दिसत नसल्याचे चित्र आहे.