
Ajir pawar : बीड खून प्रकरणानंतर राज्यभर आंदोलनाचे इशारे दिले जात असताना आणि भाजपा-संघ परिवारातून धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात वातावरण असताना पालकमंत्री पद वाटपात या प्रकरणी भाजपाची अप्रत्यक्ष भूमिका जाहीर झाल्याचे दिसून आले, म्हणूनच बीडचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांच्याऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले. त्यातून भाजपाच्या नेतृत्वाने मंत्री मुंडे यांच्यासह अजित पवार यांनाही इशारा दिल्याचे समजले जात आहे.
याचे कारण म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी अजित पवार गटाचा दावा होता. मात्र हे पालकमंत्रीपद भाजपाच्या गिरीश महाजन यांना देण्यात आले. शिंदे गटाचे मंत्री दादाजी भुसेही यासाठी उत्सुक होते. या शिवाय अनेक ठिकाणी पवार गटाला डावलण्यात आल्याने आता अजित पवारांनाही सत्तेत एकप्रकारे साईडलाईन केले जात असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
भाजपाचे पारडे जड:
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण खूनानंतर बीड जिल्ह्यासह राज्यात संतापाची लाट उसळली आणि पाच वर्षांच्या अंतराने मुख्यमंत्रीपद मिळालेलं भाजपा सरकारची कोंडी झाली. खरं तर निवडणुकीपूर्वीच अजित पवार गट जेव्हा भाजपासोबत सत्तेत आला, तेव्हाच संघ आणि भाजपाच्या वरिष्ठांनी त्यांना घेऊ नये याबाबत नाराजी व्यक्त केली होती. पण सत्तेच्या गणितासाठी त्यांना भाजपाला बरोबर घ्यावे लागले. मात्र विधानसभा निवडणुकीत सध्या तरी भाजपाचे पारडे जड असून त्यांना बहुमतासाठी अवघ्या पाच ते सहा आमदारांची आवश्यकता आहे.
ठाकरे गटाची मदत होणार?
त्यासाठी अपक्ष, शरद पवार गट किंवा ठाकरे गट यांच्या माध्यमातूनही ती पूर्ण होऊ शकते असा अंदाज भाजपाल आता आला आहे. दुसरीकडे ठाकरे गटानेही सरकारशी जुळवून घ्यायचे ठरवलेले दिसते. हे सर्व पाहता आता भाजपाला वादग्रस्त ठरलेल्या धनंजय मुंडे यांच्यासह अजित गट आणि शिंदे गटाची फार आवश्यकता राहिलेली नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीनंतर भाजपा या पक्षांना सत्तेतून डच्चू मारू शकतो, अशी चर्चा आहे. म्हणूनच सध्या पालकमंत्री पद वाटपात भाजपाने नाशिक जिल्ह्याला, गिरीश महाजन यांची नेमणुक केली. मात्र सध्या त्याला स्थगिती दिली. दुसरीकडे पंकजा मुंडे यांनाही बीड जिल्ह्यापासून दूर ठेवून त्यांना जालन्याचे पालकमंत्रीपद दिले आहे.
एकाच दगडात अनेक राजकीय पक्ष्यी आणि पक्षही…
पंकजा मुंडे यांना जालन्याचे पालकमंत्रीपद देऊन जालन्यातील माजी मंत्री रावसाहेब दानवे, शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्या राजकारणावर वचक ठेवला जाणार आहे, तर मुंडे कुटुंब बीडपासून दूर ठेवले जाऊन त्यांनाही इशारा देण्याचाच प्रकार आहे. तर धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद न देता ते अजित पवारांना देणे आणि दुसरीकडे अजित पवार यांनाही मर्यादा घालणे अशा एकाच दगडात अनेक पक्ष मारण्याचे राजकारण सध्या भाजपाकडून सुरू असून त्यातून लवकरच धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद धोक्यात येईल हे नक्की असल्याचे भाजपाच्या वर्तुळातून बोलले जात आहे.