ई-पीक पाहणी नोंदीची जबाबदारी कोतवालावर असते; परंतु संपावर गेल्यामुळे आता पोलिस पाटलांच्या खाद्यांवर हि जबाबदारी देण्यात आली आहे .यातील तांत्रिक बाबीची त्यांना माहिती नसल्यामुळे त्यांची कोंडी झाली आहे , काम वेळेत केले नाही, तर ‘कारणे दाखवा’ अशी नोटीस बजावू, अशी तंबी प्रशासन देऊ लागल्यामुळे आता या विरोधातील तक्रार कोणाकडे द्यायची, असा प्रश्न खुद्द पोलिसपाटलांनाच पडला आहे.
राज्य शासनाने ई-पीक पाहणीची नोंद ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक शेतकऱ्यांनी आपल्या शिवारात जाऊन ही माहिती ऑनलाइन भरणे अपेक्षित होते.
परंतु , अनेक शेतकरी माहिती भरण्याबाबत अज्ञान आहेत किंवा अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाइल नाहीत, त्यातही सर्व्हर डाऊन असल्यामुळे कामच होत नाही. आता कोतवालांचा संप असल्याने हे काम ठप्प आहे.
खरीप हंगाम संपत आला तरी शासनपातळीवर पीक पाहणी अधिकृत आकडा उपलब्ध नाही. त्यामुळे हे काम करून घेण्याची जबाबदारी कामगार पोलिसपाटील, ग्रामपंचायत ऑपरेटर ,धान्य दुकानदार,यांच्यावर सोपवली आहे .
किचकट प्रक्रिया अन् दमछाक
जुन्या पोलिसपाटील यांना मोबाइल वापरता येत नाही. त्यातच मोठ्या गावामध्ये हजारहून अधिक खातेदार आहेत. त्यामुळे ई-पीकची प्रक्रिया करताना जुन्या पोलिसपाटील यांची अडचण होत आहे. त्यामुळे अनेक पोलीसपाटील यांनी आपल्या मुलांनाही या कामात मदतीसाठी घेतले आहे .
सणासुदीच्या काळामध्ये ‘पाटील’ शिवारात..
सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे.. पोलिसपाटील यांच्यावर या काळामध्ये स्थानिक पातळीवर कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते.












