नालेगाव येथील बाबासाहेब व देविदास आज परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत जास्त उत्पादनाची शेती करत आहेत. त्यांनी पाणी नियोजन सह आधुनिक सिंचन व्यवस्था आखत शेतीला सेंद्रिय खतांची जोड दिली व तसेच त्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून,जमिनीचे आरोग्य राखले .
बाबासाहेब व देविदास एकनाथ गायकवाड हे छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथील रहिवाशी आहेत. यांना वडिलोपार्जित ५० एकर शेती आहे. मात्र अल्प सिंचन व्यवस्था,अधिक खर्चासह कमी उत्पादन , मजुरांची वारंवार भासणारी कमतरता, आदी विविध समस्येपुढे गायकवाड बंधू हतबल झाले होते. ज्यातून मार्ग शोधण्यासाठी त्यांनी कृषी विभाग,कृषी विद्यापीठे, आदींच्या भेटी दिल्या नवनवीन तंत्रज्ञान समजून घेतले आणि गेल्या ७ ते ८ वर्षांपासून आता ते फायद्याची शेती करत आहेत .
शेतात रासायनिक खतांचा वापर कमी करून बाबासाहेब यांनी सेंद्रिय खतांचा वापर वाढविला आहे. तसेच मुक्त संचार व्यवस्थेसह देशी व संकरीत जनावरांचा गोठा,वेळोवेळी विहरीतील पाणी पातळीची नोंद घेणे, अत्याधुनिक शेती अवजारांसाठी घरीच वेल्डिंग वर्कशॉप ,प्रजन्यमापक द्वारे पावसाची नोंद, आदी सर्वांच्या मदतीने बाबासाहेब व बंधु देविदास शेती करत आहेत .
बारामाही पाणी उपलब्धते करिता १ व १.५ एकर असे दोन शेततळे देखील त्यांनी केले आहे.अत्याधुनिक तंत्रज्ञानाची अवजारे तयार करून त्या द्वारे पिकांची लागवड पेरणी केली जाते. गायकवाड बंधु त्यांच्या शेतात उन्हाळी कांदा, टोमॅटो, अद्रक, ज्वारी, बाजरी,मका, कपाशी, मुग, भुईमुग आदी पिके घेतात. तसेच त्यांच्या शेतात त्यांनी एक हेक्टर बांबू लागवड देखील केली आहे.
गोठयातून शेतीला समृद्धी..
त्यांनी मुक्त संचार गोठा तयार केला आहे त्यामध्ये सध्या चार बैल, दोन म्हैस, दोन एच एफ गाई, तीन शेळ्या, चार गीर गाई आहेत. तसेच एका ताडपत्रीचे आच्छादन केलेल्या खड्ड्यात या गोठ्यामधून गोमूत्र व शेण बाहेर जाईल अशी व्यवस्था त्यांनी केली आहे. तेथून फिल्टर होऊन पंपच्या मदतीने ठिबकद्वारे हे द्रावण शेतात पिकांना देण्यात येते.
पावसाची व विहीरीतील पाण्याची नोंद..
विहरीतील पाणी पातळीची देखील ते नोंद ठेवातात, पावसाळ्यामध्ये बाबासाहेब दैनंदिन घरावर ठेवलेल्या प्रजन्यमापकाद्वारे नोंद घेत झालेल्या पावसाची नोंद घेतात. त्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये पिकांची निवड करणे, व्यवस्थापन करणे सोपे जात असल्याचे बाबासाहेब सांगतात.
पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देणे गरजेचे..
शेतीत नवनवीन प्रयोग करणे आवश्यक आहे आधुनिकतेची जोड पारंपारिक शेतीला देणे आवश्यक आहे.
. तेव्हाच शेतकरी खऱ्या अर्थाने समृद्ध होईल. – बाबासाहेब गायकवाड.












