
Agricultural subsidies : पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. आतापर्यंत ५३४४ लाभार्थ्यांना एकूण १२.९ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
केंद्र सरकारकडून ६० टक्के आणि राज्य सरकारकडून ४० टक्के निधी या योजनेसाठी उपलब्ध करून दिला जात आहे, अशी माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत दिली.
सदस्य अरुण लाड यांनी या विषयावर लक्षवेधी सूचना मांडली होती, तर सदस्य सदाभाऊ खोत यांनी चर्चेत सहभाग घेतला. राज्यमंत्री जयस्वाल यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात निधी प्राप्त झाल्यामुळे २१ तारखेला अनुदान वितरण प्रक्रिया पार पडली. सध्या १३५६ लाभार्थ्यांचे अनुदान वाटप शिल्लक असून, केंद्र सरकारकडून उर्वरित निधी मिळाल्यानंतर हे वाटप लवकरच पूर्ण करण्यात येईल.
राज्यमंत्री जयस्वाल यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळावा म्हणून शासन विशेष मोहीम राबवणार आहे. भविष्यात अधिक प्रभावी कृषी योजना आखून शेतकऱ्यांना मदत करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.