
Onion market prices : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातशुल्क १ एप्रिलपासून काढून टाकण्याचे ठरवले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम बाजारावर पाहायला मिळाला. सोमवारपासून कांदा बाजारभाव चढे राहिले. विशेषतः २४ आणि २५ मार्च रोजी उन्हाळी कांद्याच्या दरांत वाढ झाली आहे. मागील काही आठवड्यांपासून स्थिर असलेले कांद्याचे भाव आता वाढीच्या दिशेने सरकत असल्याचे चित्र बाजारपेठांमध्ये पाहायला मिळत आहे. लासलगाव, पिंपळगाव बसवंत, पुणे, सोलापूर, जुन्नर, नारायणगाव आणि अहिल्यानगर या प्रमुख बाजारपेठांमध्ये उन्हाळी कांद्याच्या दरांत वाढ झाली आहे.
२१ ते २५ मार्च दरम्यान उन्हाळी आणि लाल कांद्याच्या बाजारभावात सातत्याने सुधारणा दिसून आली. विशेषतः लासलगाव, पिंपळगाव बसवंत, सोलापूर, जुन्नर-नारायणगाव या बाजारात दर वाढले. उन्हाळी कांद्याच्या मागणीत वाढ झाल्यामुळे २१ मार्चच्या तुलनेत २५ मार्च रोजी कांद्याच्या दरात ₹२०० ते ₹३०० पर्यंत वाढ दिसली.
लासलगाव बाजार समितीत २३ मार्च रोजी उन्हाळी कांद्याचा दर सरासरी ₹१५०० ते ₹१७५२ इतका होता. मात्र, २४ आणि २५ मार्च रोजी हा दर वाढून ₹१६०० ते ₹१८१८ पर्यंत पोहोचला. पिंपळगाव बसवंतमध्ये देखील हीच स्थिती दिसून आली. २३ मार्चला ₹१४०० ते ₹१७०० इतक्या दराने विक्री झालेल्या कांद्याने २५ मार्चला ₹१५०० ते ₹१८१८ पर्यंत मजल मारली. पुणे आणि पिंपरी बाजारपेठांमध्ये उन्हाळी कांद्याच्या दरांत ₹१०० वाढ झाली असून, २५ मार्चला हा दर ₹१५०० ते ₹१७०० च्या घरात पोहोचला.
सोलापूरमध्ये देखील उन्हाळी कांद्याच्या दरांत वाढ झाली असून, २३ मार्चला ₹१३५० ते ₹१८०० दर मिळणाऱ्या कांद्याने २५ मार्चला ₹१४०० ते ₹१८५० पर्यंत उडी घेतली. जुन्नर आणि नारायणगाव बाजारातही कांद्याचे दर वाढले असून, २५ मार्चला ₹१५०० ते ₹१८२५ पर्यंत विक्री झाल्याचे दिसून आले. अहिल्यानगर बाजारपेठेत २४ आणि २५ मार्च रोजी उन्हाळी कांद्याचा दर ₹१४५० ते ₹१८५० पर्यंत गेला, जो २३ मार्चला ₹१३५० ते ₹१८०० इतका होता.
ही वाढ मुख्यतः निर्यातशुल्क काढल्याने झाली आहे. याशिवाय उन्हाळी कांदा टिकाऊ आणि दीर्घकाळ साठवणुकीसाठी योग्य असल्याने व्यापाऱ्यांकडून लवकरच आता मोठ्या प्रमाणावर खरेदी होणार आहे. परिणामी मागणी वाढल्याने दरांमध्ये सुधारणा झाली आहे. राज्यभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये २१ मार्चनंतरच कांद्याचे दर स्थिरावले होते. मात्र, २४ आणि २५ मार्च रोजी तेजी दिसून आली.
दरम्यान लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत हे कांद्याचे प्रमुख व्यापार केंद्र असल्याने या बाजारपेठांमधील दर वाढल्यास राज्यभर त्याचा परिणाम दिसून येतो. यंदा उन्हाळी कांद्याचे उत्पादन समाधानकारक असले तरी मागणीमुळे दर वाढले आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, पुढील काही दिवसांत दर आणखी वाढतील का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.