शेतकऱ्यांना दुष्काळ व अवकाळीची फेब्रुवारीमध्ये मिळणार भरपाई…

सरकारकडून कांदा निर्यातबंदीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शेतकरी सन्मान निधी हप्ता व दुष्काळी ४० तालुक्यातील शेतकरी तसेच अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यांकडून  मदत व पुनर्वसन विभागाने तातडीने प्रस्ताव मागविले आहेत.शेतकऱ्यांना दूध अनुदानही फेब्रुवारी महिन्यात दिले जाईल.

पावसाळ्यामध्ये पाऊस कमी पडल्यामुळे रब्बी हंगाम वाया गेला असून खरीप हंगामाची पेरणी सुद्धा कमी झाली आहे.दुष्काळ ४० तालुक्यांत जाहीर झाला व नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांना अवकाळीचे संकट सोसावे लागले . सरकारने ५ टक्के दूध अनुदान जाहीर केले तसेच अवकाळीने बाधित शेतकऱ्यांना दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेतला .दुष्काळ ग्रस्त भागाची केंद्रीय पथकाने पाहणी केली. मात्र, शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही.

शेतकऱ्यांच्या शेतमालाचे दर कमी होऊ लागलेले असतानाच केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेटच कोलमडले . दुष्काळ जाहीर झाल्यावर सवलती अपेक्षित असतानाही शेती कर्जाचे पुनर्गठन झालेले नाही. गायीच्या दुधाला कमीत कमी दर मिळाला. तरी अनुदान जाहीर झाले ते शेतकऱ्यांपर्यंत पोचलेच नाही. राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. या सर्व बाबींमुळे शेतकऱ्यांमध्ये झालेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आता सरकार कडून सुरू झाला आहे.

२३० कोटी दूध अनुदान जाहीर.. 

राज्यातील ज्या दूध संघांनी गाई दूध उत्पादकांना प्रतिलिटर २७ रूपयांचा (त्याहून कमी नाही) दर दिला आहे, अशा खासगी, सहकारी, मल्टिस्टेट संघाला दूध घालणाऱ्या गाई दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रूपयांचे अनुदान मिळणार आहे. त्यासाठी गाई दूध उत्पादकांना ‘ई-गोपाला’ ॲपवरून गायीचे टॅगिंग करून त्याचा आयडी घेऊन तो बॅंकेत जमा करावा लागेल . त्यानंतर आपण दूध कोणत्या संघाला घालतो व त्याचे पेमेंट कोणत्या बॅंकेत जमा होते, त्याच खात्यात अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. राज्यातील २७० दूध संघाला लॉगिन-आयडी देण्यात आले आहे. राज्यातील गाई दूध उत्पादकांना पुढील महिन्यामध्ये २३० कोटींचे दूध अनुदान दिले जाणार आहे.

फेब्रुवारीत ८७ लाख शेतकऱ्यांना ‘सन्मान निधी’चे हप्ते.. 

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता पुढील महिन्यात केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा प्रत्येकी दोन हजार रूपयांचा हप्ता व राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. राज्यातील ८७ लाख शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारकडून फेब्रुवारीत प्रत्येकी दोन हजार रूपयांचे दोन हप्ते वाटप करण्याची तयारी तातडीने सुरू झाली आहे.

Leave a Reply