एक ऑगस्ट पासून आता शेतजमीन मोजणी अर्ज करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. शेत जमीन मोजण्याचे कामकाज ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. अशी माहिती राहता भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक योगेश थोरात यांनी दिलेली आहे.
शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीच्या मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयामध्ये वारंवार चक्रा माराव्या लागत होत्या. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे. त्यासाठी आता शेतकऱ्यांना भूमी अभिलेखन कार्यालयामध्ये चक्रा मारण्याची गरज नाही. आता मोजण्यासाठी सहा महिने प्रतीक्षा देखील करण्याची गरज नाही.
शेतकऱ्यांना सहजासहजी आपले शेतीचे अचूक नकाशे मिळण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांना जर आपल्या शेतजमिनीची मोजणी करायची असेल तर ते शेतकऱ्यांनी कार्यालयात न जाता ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे. व ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतजमीन मोजणीचे पैसे बँकेत न जाता ऑनलाईन पद्धतीने भरू शकतात.
शेतकऱ्यांना तात्काळ मोबाईल नंबर वर आपली शेत जमिन मोजणीची तारीख, मोबाईल संदेशाद्वारे कळवण्यात येईल व पुढील पंधरा दिवसाच्या आत सदरील जमिनीची मोजणी पूर्ण होऊन संबंधित शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीचा अचूक नकाशा कार्यालयात न जाता ऑनलाईन डाऊनलोड करून प्राप्त करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
उपग्रहाद्वारे मोजणी करून मोजणी नकाशामध्ये किंवा क्यूआर कोड च्या मदतीने अक्षांश व रेखांश उपलब्ध करून दिले जाणार आहेत. महसूल मंत्र्यांच्या सूचनेनुसार कार्यालयात पाच नवीन कर्मचाऱ्यांची भरती झाली असून, मोजणीसाठी खाजगी कंपनीची मदत घेऊन कमीत कमी वेळेत अचूक मोजणी करण्यावर भर दिला जाणार आहे. शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची मोजणीसाठी होणारी धावपळ आता थांबणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे, असे श्री थोरात यांनी सांगितले.