Tur bajarbhav : आपल्याकडे डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान तुरीचे काढणी केली जाते. यंदा नोव्हेंबरमध्ये जी तूर बाजारात आली, तिचे प्रमाण मागच्या वर्षापेक्षा कमी आहे. म्हणूनच यंदा तूर बाजारात भाव खाणार असा विश्लेषकांचा अंदाज आहे.
सध्या बाजारात दररोज सरासरी अडीच ते तीन हजार क्विंटल तूरीची आवक होताना दिसत असून बाजारभाव सरासरी साडेसात हजार ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल असे दिसून येत आहेत. लाल तुरीच्या तुलनेत पांढऱ्या तुरीला चांगला बाजार मिळताना दिसत आहे.
गुरूवार दिनांक १२ डिसेंबर रोजी सोलापूर बाजारात लाल तुरीची सुमारे १२०० क्विंटल आवक होऊन कमीत कमी दर ७७२६, जास्तीत जास्त ९६७७, तर सरासरी ८९१४ रुपये प्रति क्विंटल असा होता. तर पांढऱ्या तुरीची सुमारे पावणेदोनशे क्विंटल आवक होऊन किमान दर ८७०० रुपये, तर सरासरी दर ९ हजार २०० रुपये प्रति क्विंटल इतका आहे.
जालना जिल्ह्यात पांढऱ्या तुरीची ६२८ क्विंटल आवक होऊन किमान भाव ७ हजार ५० रुपये, कमाल भाव १० हजार ३०० रुपये तर सरासरी ९२०० रुपये इतका होता. लातूर बाजारात तुलनेने लाल तुरीची कमी आवक झाली. या ठिकाणी सुमारे २०० क्विंटल आवक होऊन किमान दर ७ हजार, तर सरासरी ७ हजार ७०० रुपये इतका होता.
अकोला बाजारात लाल तुरीला ८ हजार ८००, तर अमरावती बाजारात याच प्रकारच्या तुरीला ९ हजार ४९५ रुपये सरासरी बाजारभाव मिळाला.












