जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचे संकेत, देशात १०६ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज…

जून महिन्यामध्ये पावसाच्या असमान वितरणानंतर जुलैमध्ये शेतकऱ्यांसाठी आशादायी चित्र पाहायला मिळणार अशी शक्यता आहे. सरासरीपेक्षा अधिक पावसाचे संकेत जुलै महिन्यात असून, देशामध्ये १०६ टक्क्यांपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. जुलै महिन्यात महाराष्ट्रामध्ये चांगल्या पावसाचे संकेत आहे तसेच कमाल आणि किमान तापमान देखील सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे.

सोमवारी (ता. १) हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी जुलै महिन्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला. देशात सरासरीपेक्षा पाऊस जून महिन्यात कमी झाला आहे. देशात सरासरी १६५.३ मिलिमीटर पाऊस जून महिन्यात पडतो. यंदा सरासरी १४७.२ मिलिमीटर म्हणजेच ८९ टक्के पाऊस जून महिन्याच्या अखेर झाला आहे.असे डॉ. महापात्रा म्हणाले.

देशाच्या बहुतांश भागात जुलै महिन्यामध्ये सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. तर वायव्य आणि पूर्व भारताचा काही भाग ,ईशान्य भारत, आणि दक्षिण द्वीपकल्पाच्या आग्नेय भागामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता जास्त असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. देशात जूलै महिन्यात १९७१ ते २०२० या कालावधीतील नोंदीनुसार २८०.४ मिलिमीटर पाऊस पडतो.

जुलै महिन्यात महाराष्ट्रासह पूर्वोत्तर राज्ये, पूर्व भारत,मध्य भारत आणि पश्चिम किनारपट्टीलगत कमाल तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. तर देशभरात उत्तरेकडील राज्यांचा काही भाग वगळता किमान तापमान देखील सरासरीच्या वरच राहणार आहे.

ला-निना होतोय विकसित..

सध्या सर्वसाधारण (एन्सो न्यूट्रल प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात) स्थिती असून, मॉन्सूनच्या हंगामाच्या मध्यावर ला-निना स्थिती निर्माण होण्याचे संकेत आहे. सर्वसाधारण इंडियन ओशन डायपोल (आयओडी) स्थिती हिंद महासागरामध्ये असून, उर्वरित मॉन्सून हंगामात ही स्थिती कायम राहणार असा अंदाज आहे . मॉन्सून अखेरच्या टप्प्यात तीव्र होत जाणार आहे.

महाराष्ट्रात अधिक पावसाची शक्यता

यंदा राज्याच्या अनेक भागात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे . जरी पावसाने सरासरी जून महिन्यात गाठली असली तरी पावसाचे वितरण असमान झाले आहे . सर्वदूर चांगल्या पावसाचा जुलै महिन्यातील अंदाज शेतकऱ्यांना दिलासा देईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *