अजितदादा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात यावा अशी नाराज आमदारांकडून मागणी करण्यात येत आहे .भाजपा सहित शिंदे गटांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी उघडपणे समोर येताना दिसून येत आहे.
अशातच मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होणार असून 17 जुलैपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनात अगोदर मंत्रिमंडळाचे विस्तार व खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवलेली आहे.
अजित दादा पवार यांच्या सत्तेतील सहभागाने गोंधळ
सूत्रांच्या माहितीनुसार वर्षभरापासून रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार आठवड्याभरात होण्याची शक्यता आहे. गेल्या रविवारी अजित दादा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली होती. यावरूनच वर्षभरापासून मंत्रीपदासाठी ताटकळत बसलेले भाजपचे व शिंदे गटाचे आमदार प्रचंड नाराज आहेत.
बबनराव लोणीकर यांचा समावेश
जालना मधील भाजपचे आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची चर्चा जोरात सुरू आहे . मराठवाड्यामध्ये शिंदे गटाला तीन मंत्रिपदे दिली आहेत. त्यामध्ये मंत्री संदीप भुमरे, मंत्री अब्दुल सत्तार, व मंत्री तानाजी सावंत ,यांचा समावेश आहे. तसेच अजित दादा पवार यांच्या गटाकडून मागच्या रविवारी घेण्यात आलेल्या शपथविधी मध्ये मराठवाड्यातून धनंजय मुंडे व संजय बनसोड यांना मंत्रीपद दिली आहेत. व मराठवाड्यामध्ये भाजपकडे 16 आमदार असताना पक्षाचा फक्त एकच मंत्री असल्याने येथून आमदार बबनराव लोणीकर यांची मंत्री पदासाठी वर्णी लावण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवलेली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार
राज्य मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे . केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रात भाजप बरोबर आलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचे गट यांनाही प्रत्येकी एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
केंद्रातील मंत्रिपदासाठी शिंदे गटाकडून गजानन कीर्तिकर, भावना गवळी, राहुल शेवाळे, यांची नाव आघाडीवर आहेत .तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुत्र श्रीकांत शिंदे यांचे नाव चर्चेत आहेत .दुसरीकडे अजित दादा पवार गटाकडून मंत्रीपदासाठी माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची चर्चा आहे.