
Dhananjay Munde : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे कवित्त्व अजूनही संपायला तयार नाही. या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटचा समजला जाणारा वाल्मिक कराड याच्यासह त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खुनाच्या गु्न्हयासह संघटित गुन्हेगारी विरोधातील प्रभावी कलम मकोका लावण्यात आले. त्यानंतर वाल्मिक समर्थकांनी परळीत मोठे आंदोलन केले.
दरम्यान या प्रकरणाशी मंत्री धनंजय मुंडे यांचाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. तसेच यासंदर्भात भाजपा आमदार सुरेश धस यांनीही आघाडी उघडली असून दुसरीकडे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे हेही या विरोधात रान पेटवत आहेत. अशा स्थितीत भाजपा, संघ आणि विरोधकांकडूनही मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रह होताना दिसत आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर मंत्री मुंडेंचा राजीनामा घेण्याची तयारी सुरू असल्याची राजकीय चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर सध्या तरी धनंजय मुंडे यांचा कुणीही पाठीराखा नसल्याने त्यांनी अध्यात्मिक आघाडीचा आधार घेतला नाही ना अशी चर्चा आहे. याचे कारण नामदेव शास्त्रींचे वक्तव्य. भगवान गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे हे काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नाहीत. त्यामुळे त्यांना सर्व का लक्ष करत आहेत? हे समजत नसल्याचे व्यक्तव्य करून नुकतीच मुंडे यांची बाजू घेतली.
त्यानंतर माध्यमांमधून आणि एकूण राजकीय वर्तृळात मोठा गदारोळ उठला. नंतर नामदेव शास्त्रींनी या प्रकरणात माघारी घेतल्याचे दिसत असले, तरी त्यांची या प्रकरणातील ‘एन्ट्री’ म्हणजेचे धनंजय मुंडे यांचे- शास्त्री मला वाचवा- ही चाल असून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते देवेंद्र फडणवीसांवर राजकीय निशाणा साधत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
काही वर्षापूर्वी भगवान गडावर दसरा मेळाव्यात भाषण करून देण्यावरून नामदेव शास्त्रींनी तत्कालिन मंत्री पंकजा मुंडे यांना विरोध केला होता. त्यानंतर पंकजा यांनी गोपीनाथगडाची स्थापना करून तिथे दसरा मेळावा घेण्यास सुरूवात केली. त्याही वेळेस नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली होती. सध्याच्या प्रकरणावरून समाजात धनंजय मुंडे यांची प्रतिमा मलीन झालेली असून त्यांना असलेला जनतेचा आणि समाजाचा पाठींबा कमी होताना दिसत आहे.
अशा वेळी भगवानगडाला मानणारा मोठा वर्ग बीड आणि नगरसह राज्यात आहे. म्हणूनच नामदेव शास्त्रींनी जर मुंडेंची बाजू घेतली तर एकप्रकारे धनंजय मुंडे यांना धर्मपीठाकडून क्लिन चीट मिळण्याचा प्रकार होईल आणि भविष्यात त्याचा राजकीय फायदा मुंडे यांना होईल. त्यातून आपल्या पाठीशी किती मोठा समाज उभा आहे, हे दाखवून मंत्री धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस आणि सरकारवर दबाव टाकू शकता. हेच कारण आहे की सध्या नामदेव शास्त्री मुंडे यांची बाजू घेत असल्याचे दिसत आहे. अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे