ग्रामीण भागामध्ये शेतीच्या संबंधित असलेल्या सर्व प्रशासकीय कामांकरिता तलाठी कार्यालय हाच एक पर्याय असतो. नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या जमिनीच्या संदर्भातील शासकीय कामे पूर्ण करण्यासाठी तलाठी कार्यालय मध्ये वारंवार जावे लागते.
परंतु जर आपण शासनाच्या भूमी अभिलेख विभागाचा विचार केला तर आता बरीचशी कामे ही ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत असल्यामुळे आता वारस नोंद दुरुस्ती किंवा फेरफार आणि इतर महत्त्वाचे काम आता आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून करता येणार आहेत. सध्या महसूल सप्ताह सुरू असून त्या निमित्ताने संपूर्ण राज्यांमध्ये शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने ही सुविधा सुरू केली आहे.
आता शेती संबंधित ही कामे होतील ऑनलाईन?
बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या वारसाची नोंद लावण्यासाठी आता नागरिकांना भूमी अभिलेख विभागाचे संकेतस्थळ किंवा महाभुमी या संकेतस्थळावर जाणे गरजेचे असून, त्या ठिकाणी लॉगिन केल्यानंतर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. या माध्यमातून ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तो अर्ज संबंधित गावाच्या तलाठी यांच्याकडे जाणार असून तलाठी देखील ऑनलाइन पद्धतीनेच या अर्जाची पडताळणी करतील.
जर या अर्जामध्ये काही चूक किंवा कागदपत्रे अपूर्ण असतील, तरी त्याची माहिती अर्जदाराला ई-मेलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. ऑनलाइनच्या माध्यमातून आता वारस नोंद, बोजा दाखल, किंवा कमी करणे इत्यादी करार नोंदी, मयताचे नाव कमी करणे, तसेच अज्ञान पालक कर्ताचे चे नाव कमी करणे, तसेच विश्वस्ताचे नाव कमी करणे, सातबारा उतारातील चुका दुरुस्त करणे ,आता ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे.
वारस नोंदी साठी अशा पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज..
वारस नोंदी करता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम https://pdeigr.maharashtra.gov.in या वेबसाईटवर लॉग इन करावे व लॉगिन केल्यानंतर या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. त्यानंतर हा अर्ज गावचे तलाठ्याकडे जातो व तलाठी हा अर्ज वेरिफिकेशन करतात. या वेरिफिकेशन मध्ये जर काही कागदपत्र नसतील (अपूर्ण असतील ) तर त्या संबंधित माहिती संबंधित अर्जदाराला मेलच्या द्वारे करण्यात येते. कागदपत्रे जर बरोबर असतील तर त्यांची नोंद सातबारा उताऱ्यावर लगेच करण्यात येते. एक ऑगस्टपासून राज्यामध्ये वारस नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. व त्यानंतर आता कर्जाचा बोज्या दाखल करण्यात किंवा कमी करणे व इतर महत्त्वाची सेवा देखील उपलब्ध करून देण्याची एकंदरीत नियोजन करण्यात आलेले आहे.