
budget 2025 and kanda bajarbhav: शुक्रवारी राज्यातील प्रमुख बाजारात कांदयाचे बाजारभाव तुलनेने काहीसे घसरलेले दिसून आले. या आठवड्याच्या सुरूवातीला २४०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचलेले कांदा बाजारभाव आठवडा संपत आलेला असल्याने घसरताना दिसले. त्यात प्रति क्विंटल किमान २०० रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले. शनिवारीही हा ट्रेंड टिकून राहिल्याने एका बाजूला देशाचे आर्थिक बजेट मांडले जात असताना शेतकऱ्यांचे कांदा बजेट कोलमडताना दिसते.
गुरुवारी राज्याची कांदा आवक ३ लाख १६ हजार क्विंटलपर्यंत पोहोचली, तर नाशिक जिल्हयाची आवक तब्बल दीड लाख क्विंटल पोहोचली. परिणामी दरात काहीसी घसरण झालेली पाहायला मिळाली. याच आवकेचा परिणाम म्हणून शुक्रवारीही लाल कांद्याचे दर घसरलेले दिसून आले.
लासलगाव बाजारात कांद्याचे दर सरासरी २२५० रुपये प्रति क्विंटल दिसून आले. शुक्रवारी लासलगाव बाजारात लाल कांद्याची २७ हजार ४६९ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव १ हजार रुपये, जास्तीत जास्त बाजारभाव २६५२ रुपये प्रति क्विंटल असे होते. पुणे बाजारात ही दरात घसरण होऊन ते सरासरी २ हजार रुपयांपर्यंत प्रति क्विंटल आले.
दरम्यान सोलापूर बाजारात शुक्रवारी सुमारे २५ हजार क्विंटल कांदा आवक होऊन सरासरी दर घसरून १८०० रुपये प्रति क्विंटल असे होते. नगर जिल्ह्यातील कोपरगाव बाजारात २१०० रुपये प्रति क्विंटल, राहता बाजारात २१०० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात २१५०रु. खेड चाकण बाजारात २४०० रुपये प्रति क्विंटल इतके दर होते.