
Mango cashew nut export : कोकणातील आंबा हा जगभर प्रसिद्ध असून मोठ्या प्रमाणावर निर्यात केला जातो. मात्र, निर्यातीच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी सरकार नवीन नियमावली तयार करणार आहे. कृषी विद्यापीठांमार्फत शेतकऱ्यांना कीटकनाशके, औषध फवारणी आणि निर्यात करताना घ्यावयाच्या आवश्यक काळजीविषयी मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत दिली.
राज्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातीसाठी अधिक चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नवे धोरण आणले जाणार आहे. यासंदर्भात विधान परिषद सदस्य चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, संजय केनेकर आणि सुनील शिंदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावर उत्तर देताना कृषी राज्यमंत्री जयस्वाल यांनी नव्या नियमावलीबाबत माहिती दिली.
कोकणातील आंब्याच्या उत्पादनासोबतच राज्यात विविध पिके घेतली जातात. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांबाबत योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळावे यासाठी कृषी विद्यापीठे आणि कृषी विभाग समन्वय साधणार आहेत. या नवीन नियमावलीमुळे शेतकऱ्यांना निर्यात प्रक्रियेत सोयीस्कर मार्गदर्शन मिळेल आणि त्यांचा उत्पादन खर्चही नियंत्रित राहील.