cotton seeds Prices : केंद्र सरकारने खरीप हंगाम २०२५-२६ साठी कापूस बियाण्यांच्या विक्रीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, देशभरातील शेतकऱ्यांसाठी बियाण्यांच्या जास्तीत जास्त विक्री किंमती निश्चित करण्यात आल्या आहेत.
या नव्या दरानुसार, बॅसिलस थुरिंजिएन्सिस (बीटी) कापसाच्या दोन प्रकारांसाठी पुढीलप्रमाणे किंमत निश्चित करण्यात आली आहे:
– बीजी-१ प्रकाराच्या कापूस बियाण्याचे प्रति पाकीट (४७५ ग्रॅम) मूल्य ६३५ रुपये राहील.
– बीजी-२ प्रकाराच्या कापूस बियाण्याचे प्रति पाकीट (४७५ ग्रॅम) मूल्य ९०१ रुपये राहील.
ही किंमत संपूर्ण भारतभर लागू राहील. प्रत्येक ४७५ ग्रॅमच्या पाकिटामध्ये किमान ५ टक्के आणि जास्तीत जास्त १० टक्के नॉन-बीटी कापूस बियाणे असतील, असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान बियाणे कंपन्यांना सरकारने जाहीर केलेल्या दरापेक्षा अधिक दराने विक्री करता येणार नाही. जर कोणी या नियमांचे उल्लंघन करत असेल, तर संबंधित विक्रेत्यांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी खरीप हंगामासाठी योग्य नियोजन करूनच बियाणे खरेदी करावीत. अधिक माहिती आणि शंका असल्यास स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बियाणे खरेदी करताना काय काळजी घ्यावी?
कापसाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बियाण्यांचा दर्जा आणि किंमत हे दोन्ही घटक महत्त्वाचे असतात. मागील हंगामाच्या तुलनेत यंदा किंमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे, विशेषतः बीजी-२ प्रकाराच्या कापूस बियाण्यासाठी. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करताना अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी. बऱ्याच वेळा अनधिकृत ठिकाणी बनावट बियाणे विक्री केली जात असल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. तसेच, बियाण्याच्या पाकिटावरील अधिकतम विक्री किंमत (एमआरपी) तपासूनच खरेदी करावी. त्यापेक्षा जास्त पैसे देऊ नयेत.
किंमत नियंत्रणाचे धोरण
भारत सरकारच्या जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कापूस बियाण्यांची किंमत नियंत्रणात ठेवण्यासाठी २०१५ साली एक आदेश लागू करण्यात आला होता. त्यानुसार, सरकार दरवर्षी शिफारशींचा आढावा घेऊन नवीन दर जाहीर करते. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना स्थिर दरात बियाणे मिळू शकतील आणि अनावश्यक वाढीला आळा बसेल.












