
Impact of various schemes : मराठवाड्यातील दुग्धव्यवसाय आणि पशुसंवर्धन क्षेत्राच्या विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. दुग्ध उत्पादन वाढवणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पशुधनाचे आरोग्य सुधारणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे या उद्देशाने अनेक योजनांची अंमलबजावणी केली जात आहे.
राज्यात दुग्धविकासाकरिता राष्ट्रीय कार्यक्रम (NPDD), पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी (AHIDF), राष्ट्रीय गोकुळ अभियान (RGM)आणि राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) अशा योजना कार्यान्वित असून, यामुळे दुग्ध उत्पादन खर्च कमी होऊन, शेतकऱ्यांना अधिक लाभदायक दर मिळण्यास मदत होत आहे.
विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाची भरारी
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायात सहभागी करून त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी 2016 मध्ये विदर्भ आणि मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पांतर्गत दूध संकलनाची मोठी वाढ झाली असून, आजवर 3411 गावांमध्ये विस्तार होऊन 35,000 हून अधिक शेतकरी रोज सरासरी 4.5 लाख लिटर दूध पुरवत आहेत या योजनेअंतर्गत 2303.26 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांना दर्जेदार पशुवंश उपलब्ध व्हावा यासाठी 273 कृत्रिम रेतन केंद्रे उभारण्यात आली असून, यामुळे मराठवाड्यात 20,979 उच्च जनुकीय गुणवत्ता असलेली वासरे तयार झाली आहेत. तसेच, मदर डेअरीने नांदेडसह चार जिल्ह्यांत दूध संकलन केंद्रांचे जाळे उभारले आहे, ज्यामुळे 1673 शेतकरी नियमित दूधपुरवठा करत आहेत
नव्या योजना आणि पुढील वाटचाल
मराठवाड्यातील दुग्धव्यवसाय वाढीस चालना देण्यासाठी “दुभत्या जनावरांचा पुरवठा” योजना 2023-24 आणि 2024-25 या वर्षांसाठी राबविली जात आहे. तसेच, पशुधनाला पुरेसा चारा उपलब्ध व्हावा म्हणून सुधारित चारा बियाणे शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर दिले जात आहे.
शेतकऱ्यांना संघटित करून चारा उत्पादनाला गती देण्यासाठी अण्णा चारा उत्पादक कंपनी लिमिटेड स्थापन करण्यात आली असून, या कंपनीने 300 हून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी केली आहे
या विविध योजनांमुळे मराठवाड्यातील दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम होत असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यास मोठी मदत होत आहे.