
Rain forecast : राज्यात ३ मेपासून १० मेदरम्यान काही ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता असून, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग आणि हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष घाबरू नये, मात्र योग्य ती सावधगिरी अवश्य बाळगावी, असे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले आहे.
या आठवड्यात महाराष्ट्रातील कोकण, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, नांदेड, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती अशा २६ जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. एखाद्या-एकाद्या दिवशी काही भागांत वीजा, गडगडाट, वाऱ्यासह किरकोळ पावसाचा अनुभव येऊ शकतो. विशेषतः विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, चंद्रपूर, ब्रम्हपुरी व गोंदिया या जिल्ह्यांमध्ये या वातावरणाचा प्रभाव अधिक जाणवू शकतो. काही ठिकाणी हलकी गारपीटही होऊ शकते.
सध्या महाराष्ट्रात दिवसाचे कमाल तापमान सरासरी ३८ अंश सेल्सिअसच्या आसपास असून, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये ते ४० अंशांपर्यंत पोहोचले आहे. मात्र पुढील आठवड्यात तापमान १ ते २ अंशांनी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाचा त्रास काहीसा कमी जाणवेल.
सध्या राज्यात कुठेही उष्णतेची लाट किंवा रात्रीचा उकाडा जाणवत नाही. हवामान तुलनेत सुसह्य राहण्याची शक्यता आहे.
या वातावरणातील बदलाचे मुख्य कारण म्हणजे अरबी समुद्रात दीड किलोमीटर उंचीवर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरणाऱ्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांची स्थिती. या स्थितीमुळे विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात उत्तरेकडून येणारे आर्द्रतायुक्त वारे ताशी ४५ ते ५० किलोमीटर वेगाने वाहत असून त्यामुळे ढगाळ हवामान निर्माण होत आहे.
अशा प्रकारच्या वातावरणात शेतकऱ्यांनी काढणीच्या प्रतीक्षेत असलेल्या पिकांवर योग्य ती आच्छादनाची उपाययोजना करावी, तसेच हवामानाचा अंदाज पाहून पुढील शेती कामांची योजना आखावी, असे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे.