महाराष्ट विधानसभा निवडणुकांचे मतदान लवकच 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दुसरीकडे मतदानामुळे ऊसाचा गाळप हंगाम लांबणीवर जाण्याचे संकेत सरकारकडून मिळत असले, तरी अनेक ठिकाणी आजपासून साखरेचा (Sakhar Galap Hangam) हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही कारखान्यांमध्ये मोळी पूजन झाले असून ऊस तोड कामगार ऊस तोडणीसाठी शेतकºयांच्या शेतात दाखल होत आहे.
निवडणुकांच्या हंगामासाठी सरकारने गाळप परवाने (Sugar Crushing Permission) उशीरा देण्याचे धोरण ठेवले, तरी काही कारखाने बंडखोरी करणार असून आजच गाळप हंगाम सुरू होण्याची शक्यता काही कारखानदारांनी व्यक्त केली आहे.
राज्यातील ऊस पट्ट्यातील म्हणजेच कोल्हापूर, सांगली, सोलापूर परिसरातील कारखानदार आजपासूनच कारखाने सुरू करण्याच्या तयारीत आहेत. याचे कारण म्हणजे शेजारी असलेल्या कर्नाटक राज्यातील कारखानेही आजपासून सुरू होत आहे.
जर राज्यातील कारखाने मतदानानंतर सुरू झाले, तर ऊसाची परराज्यात पळवापळवी होऊन त्याचा फटका राज्यातील कारखान्यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा कारखानदार लवकच हंगाम सुरू करणार असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे.
सांगली जिल्ह्यातील छत्रपती सहकारी कारखाना, पळूस येथील क्रांती अग्रणी सहकारी साखर कारखाना यासह मागील दोन तीन दिवसात अनेक कारखान्यांचे मोळीपूजन होऊन गाळपाचा शुभारंभ झाला आहे. यातील छत्रपती कारखान्याने 11 लाख, तर क्रांती अग्रणीने 13 लाख टनांचे ऊस गाळप उदिष्ट ठेवले आहे.
नाशिक जिल्ह्यातील ऊसाचा पट्टा असलेल्या निफाड परिसरात काल दिनांक 14 पासूनच ऊसतोडीसाठी ऊसतोड कामगार बैलगाड्यांसह दाखल होत असून अनेक ठिकाणी ऊसतोड कामगारांच्या राहुट्या पडल्या असल्याचे चित्र आहे.
सायखेडा आणि चांदोरी परिसरात ऊसतोड कामगारांच्या आगमनामुळे ऊस उत्पादकांमध्ये चैतन्याची लहर आहे. साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात 2023-24 च्या गाळप हंगामात 16 नोव्हेंबर 2023 पर्यंत एकूण 133 साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये 63 सहकारी आणि 70 खाजगी साखर कारखान्यांचा समावेश होते.