Crop care : ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. ऊस पिकात खूरपणी करून तण नियंत्रण करावे. हंगामी ऊसाची लागवड 15 फेब्रूवारी पर्यंत करता येते. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हळद काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी पिकाला पाणी देणे बंद करावे. हळद पिकाची पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात तेव्हा हळदीची काढणी करावी. कंद काढणीपूर्वी संपूर्ण पाने जमिनीलगत कापून घ्यावी.
उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत.
हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी अळी अवस्था लहान असताना एच.ए.एन.पी.व्ही 500 एल.ई. विषाणूची 10 मिली प्रति 10 लिटर पाणी (200 मिली प्रति एकर) याप्रमाणे फवारणी करावी.
तर किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर इमामेक्टिन बेंझोएट 5 % – 4.5 ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर 88 ग्रॅम) किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल 18.5 % – 3 मिली प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर 60 मिली) किंवा फ्लुबेंडामाईड 20 % – 5 ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर 125 ग्रॅम) फवारावे. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची काढणी करून घ्यावी.
करडई पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. उशीरा पेरणी केलेल्या करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी तीळ पिकास मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी व भारी जमिनीत 12 ते 15 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे. सिंचन हे शक्यतो तूषार सिंचन पध्दतीने करावे.












