Unhali kanda bajarbhav : यंदा देशात रब्बीची कांदा लागवड वाढली; उन्हाळी कांदा दर वाढणार कि घटणार?

Unhali kanda bajarbhav: रब्बी कांद्याच्या बाजारभावाबद्दल केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून मोठी माहिती प्राप्त होत आहे. कृषी मंत्रालयाने दिलेल्या या माहितीनुसार जानेवारीअखेरपर्यंत रब्बीच्या कांद्याच्या क्षेत्रात यंदा मागच्या वर्षीपेक्षा वाढ झाली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार या वर्षी सुमारे १८ ते २० टक्के कांदा लागवड जास्त झाली आहे.

देशात रब्बी कांद्याचे एकूण सरासरी लागवड क्षेत्र हे १०.२३ लाख हेक्टर इतके असते. त्यात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश हे प्रदेश आघाडीवर असतात. मागील वर्षी रब्बीच्या कांदयाची लागवड संपूर्ण देशात ८ लाख १ हजार हेक्टर इतकी होती. यंदा त्यात वाढ होऊन ती ९.६२ लाख हेक्टर इतकी झाली आहे. थोडक्यात कांदा लागवडीत १ लाख ६१ हजार हेक्टरने वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा मागच्या वर्षाच्या तुलनेत उत्पादनात वाढ होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान यंदा खरीप हंगामातही खरीप आणि लेट खरीपात देशात सुमारे २० टक्के वाढ झाली होती. आणि रब्बी हंगामातील २० टक्के वाढ लक्षात घेता यंदा मागील वर्षीपेक्षा बाजारात १८ ते २० टक्के कांदा अधिक बाजारात येईल. मागच्या वर्षी देशात कांद्याचे उत्पादन ३१६ लाख मे. टन होते. यंदा त्यात १८ ते २० टक्के वाढ होऊन ते ३७५ लाख मे टन इतके होऊ शकते असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र असे असूनही लवकर सुरू झालेला उन्हाळा आणि उशिरा झालेल्या लागवडी यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

खरीपात लागवड वाढूनही भाव राहिले टिकून
यंदाच्या खरीप हंगामात लागवड सुमारे २० टक्क्यांनी वाढली, पण तरीही डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातील २० ते २५ दिवसांचा अपवाद सोडल्यास बाजारभाव २ हजाराच्या आसपास स्थिर राहिलेत. याचे कारण म्हणजे यंदा सुरू असलेली निर्यात आणि निर्यातीवरील हटविलेले निर्बंध. सध्या २० टक्के निर्यात शुल्क सोडले, तर निर्यातीवर कुठलीही बंधने नाहीत. त्यामुळे अपेडा कडून उपलब्ध आकडेवारीनुसार नोव्हेंबर २४ पर्यंत यंदा सुमारे पावणे सात लाख मे. टन कांदा निर्यात झालेला आहे. मागच्या रब्बी हंगामात जुलैपर्यंत केवळ पावणेतीन लाख कांदा निर्यात झाला होता. तरीही एप्रिलच्या शेवटी आणि मे महिन्यात कांद्याचे बाजारभाव ३ हजाराच्या पुढे गेले होते.

रब्बीतही भाव टिकणार का कांद्याचे?
डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्याची निर्यात जोडली, तर अंदाजे एकूण १० ते ११ लाख मे. टन निर्यात झाली असून देशातील मागणीही वाढली आहे. याशिवाय दिवाळीच्या हंगामात अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या कांद्याचे नुकसान केले. त्याचाही परिणाम कांदा उत्पादनावर झालेला आहे. निर्यात बंदी किंवा निर्यात बंधने नसल्याने उन्हाळी हंगामात निर्यात चांगली होण्याची शक्यता आहे. तसेच निर्यात होणाऱ्या कांदा प्रकियेसाठीही सुमारे १० लाख मे. टन कांदा वापरला जाणार असून देशांतर्गत प्रक्रियेसाठीही कांद्याची मागणी जास्त आहे. साठवणुकीतही सुमारे २५ लाख मे. टन कांदा राहण्याची शक्यता आहे.

परिणामी यंदा उत्पादन वाढले, तरी मागच्या वर्षीप्रमाणे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव टिकून राहतील किंवा स्थिर राहतील. बाजार तज्ज्ञांच्या माहितीनुसार यंदा उन्हाळी कांदा आवक मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणावर होईल आणि नंतरही एप्रिलमध्ये कांदा आवक मोठीच राहिल, मात्र एप्रिलच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून बाजार २ हजार किंवा त्याच्या आसपास प्रति क्विंटल जाऊन मे महिन्यापर्यंत वाढू शकतील. अर्थात हा केवळ अंदाज असून शेतकऱ्यांनी एकदम कांदा बाजारात विक्रीला न आणता तो साठवून ठेवावा आणि थोडा थोडा बाजारात आणावा असे आवाहन शेतकरी उत्पादक संघटनांनी केले आहे.

Leave a Reply