climate sericulture : हवामान बदलतेय रेशीम शेतीची अशी घ्या काळजी हवामान अंदाजानुसार दिनांक 14 ते 20 फेब्रुवारी 2025 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे.
तसेच दिनांक 21 ते 27 फेब्रुवारी 2025 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे.
त्याअनुषंगाने रेशीम शेतीबद्दल काय काळजी घ्यावी याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने रेशीम शेतीसाठी पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारस केली आहे.
रेशीम शेती व्यवस्थापन:
रेशीम उद्योजकांच्या रेशीम अळ्या कोष न करणे किंवा पोचट कोष होणे हा प्रश्न आहे. बहुतांशी शेतकरी कापूस, ऊस, सोयाबीन व भाजीपाला ईत्यादी पिकांकडून तुती लागवडीकडे वळलेले आहेत.
पूर्वी शेतातील जमिनीत पीक संरक्षण करण्यासाठी वापरात आलेले किटकनाशक उदा. कोराझीन किंवा बुरशीनाशक, तणनाशक उदा. ग्लायफोसेट ईत्यादी चे प्रमाण किंवा शिल्लक राहीलेला अंश जमिनीत राहिलेला असतो.
नंतर तेथे तुती लागवड केली जाते आणि तुतीला आलेली पाने रेशीम किटकास खाद्य म्हणून दिल्यावर किटक मरताना दिसतात किंवा अळ्या कोष करत नाहीत, पोचट कोष होतात. त्यावर उपाय म्हणजे 20 टन कुजलेले शेणखत प्रति हेक्टर किंवा 5 टन गांडूळ खत समान दोन हप्त्यात जुन व नोव्हेंबर महिन्यात जमिनीत द्यावे व नंतर हलके पाणी द्यावे.












