*द्राक्ष घडांची ऑक्टोबर छाटणीनंतर अशी घ्या काळजी*

सध्याचा काळ द्राक्षांच्या घडवाढीचा असून, या दिवसांत ऑक्टोबर छाटणीनंतर द्राक्षबागेची निगा राखणे गरजेचे आहे. ऑक्टोबर छाटणीनंतर येणार्‍या फुटीतून द्राक्षाचे घड बाहेर पडल्यानंतर त्याच्या देठाची लांबी वाढू लागते. घडातील पाकळ्या पसरून वाढू लागतात. योग्य हवामानात घड वाढू लागतात. सुरुवातीला घड पोपटी असतो. घडापुढील फुटींची तीन पाने मोकळी होताना त्या घडाचा रंग हिरवा होऊ लागतो.

द्राक्ष पिकावर कमी-जास्त तापमानाचा मोठा परिणाम होत असतो. द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांनी तापमानातील फरक लक्षात घेऊन पिकाची काळजी घेणे आवश्यक असते.

या काळात घड खालील द्रावणात बुडवावा :

१०० लिटर पाणी अधिक १०० ग्रॅम युरिया फॉस्फेट अधिक २ ग्रॅम जिब्रॅलिक ऍसिड अर्थात जी. ए. (विरघळून घ्यावा) अधिक २५० मि. लि. अगत्य ऍग्रो टॉनिक.
घडातील नवीन पेशींचे विभाजन होत असताना बोरानची आवश्यकता असते.

दहा टक्क्यांपेक्षा जास्त चुनखडी असलेल्या जमिनीतून तसेच वाफसा नसलेल्या जमिनीतून बोरान योग्य प्रमाणात उचलले जात नाही म्हणून दर तीन वर्षांनी अडीच किलो बोरॅक्स जमिनीतून द्यावे.

तसेच फुलोर्‍यापूर्वी सात दिवस अगोदर व फुलोर्‍यानंतर सात दिवसांनी २०० लिटर पाणी व २०० ग्रॅम बोरिक ऍसिड अधिक ५०० मि. लि. अगत्य ऍग्रो टॉनिक अशी फवारणी करावी. यानंतर दुसर्‍या दिवशी २०० लिटर पाणी अधिक ५०० ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी केल्यास पानांतील हरितद्रव्याचे प्रमाण वाढते.

याच वेळी घडातील नवीन पेशींचे विभाजन होत असताना ढगाळ वातावरण निर्माण झाले किंवा काही कारणाने अगोदर पाण्याचा ताण पडला तर घड फुलोर्‍यात येण्यापूर्वी घडातील कळ्या एकदम गळू लागतात. अशा वेळी २०० लिटर पाणी अधिक २०० ग्रॅम बोरॉन अधिक अगत्य ऍग्रो टॉनिक असा स्प्रे घेऊन घडातील कळ्यांची गळ थांबवावी.

कृत्रिम जी. ए. चे कार्य व वापरण्याच्या अवस्था
एक प्रकारच्या विशिष्ट बुरशीपासून जिब्रॅलिक ऍसिड (जी. ए.) तयार केले जाते.

जी. ए. चे कार्य
🔰 द्राक्षवेली स्वतः जी. ए. तयार करीत असतात. ते वेलीत एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी वाहून नेले जाते. मात्र कृत्रिम जी. ए. देऊन त्या ठिकाणीच शोषले जाते.
🔰 नवीन वाढीच्या ठिकाणच्या पेशींची लांबी जी. ए. वाढवित असते. त्याचप्रमाणे जवळच्या ठिकाणचे अन्नघटक खेचून आणण्याचे काम करीत असते.
🔰जी. ए. त अन्नघटक खेचण्याची शक्ती असल्यामुळे वाढणार्‍या भागात स्पर्धा होत असल्यामुळे मण्यांची विरळणी साधली जाते.
🔰 घडाच्या १० टक्के फुलोर्‍यात १० पी. पी. एम. जी. ए., २५ टक्के फुलोर्‍यात १५ पी. पी. एम. व ५० टक्के फुलोर्‍यात २० पी. पी. एम. जी. ए. स्प्रे दिल्यास मण्यांची लांबी वाढते आणि पोलेमणी गळून पडतात व घडातील मण्यांची विरळणी होते.
🔰छाटणीपासून सुमारे ४० दिवसांनंतर जिर्‍याएवढे मणी झाल्यानंतर ६० पी. पी. एम. जी. ए. अधिक अगत्य ऍग्रो टॉनिक लिटरला ५ मि. लि. घेऊन घडांना डीप द्यावा.
🔰त्यानंतर घडातील पाकळ्यांची व मण्यांची विरळणी करून फुलोर्‍यातील डीपनंतर ५० पी. पी. एम. च्या जी. ए. च्या द्रावणात अधिक अगत्य ऍग्रो टॉनिक लिटरला ५ मि. लि. घेऊन घड बुडवावेत.

गर्डलिंग
द्राक्षाचे मणी रसरशीत, गरयुक्त, वजनदार व टिकाऊ करण्यासाठी द्राक्षवेलींना गर्डलिंग करणे आवश्यक आहे. फुलोर्‍यातील डीपिंगनंतर ३ ते ४ दिवसांनी जादा पाणी देऊन किंवा ठिबकचे पाणी वाढवूनच गर्डलिंग करावे. मणी ज्वारीच्या आकाराचा असताना गर्डलिंग केल्यास मण्यातील पेशी विभाजनास मदत केली जाते. तसेच या पेशी मोठ्या होऊन अन्न साठवून गर बनवितात.

गर्डलिंग करताना खोडाच्या सालीच्या आतील बाजूस असलेल्या रसवाहिन्या किंवा फ्लोएम तोडण्यासाठी योग्य आकाराचे गर्डलिंग करावे. त्यामुळे गर्डलिंगच्या वरील भागात सायटोकायनीनची पातळी वाढते. गर्डलिंगची जखम २१ दिवसांत पूर्ण करणे किंवा मिळून येणे आवश्यक आहे म्हणून गर्डलिंगच्या जागी शेण-मूत्राच्या द्रावणात एखादे किटकनाशक वापरून पेस्ट लावावी.

विरळणी
जी. ए. गर्डलिंग व थिनिंग ही द्राक्षाच्या गुणवत्तेच्या उत्पादनाची त्रिसूत्री आहे. पूर्ण वाढलेल्या घडात १५०० पर्यंत मणी असतात. या मण्यांची विरळणी करणे आवश्यक आहे म्हणून पाकळ्यांचे व मण्यांचे थिनिंग करून घडात १५० ते १७५ एवढेच मणी ठेवावेत व त्याखालील घडाचा शेंडा मारावा.

चांगल्या पाकळ्या असलेल्या घडातील वरच्या तीन पाकळ्या सोडून खालील दोन पाकळ्या कमी कराव्यात. पुन्हा दोन पाकळ्या सोडून खालील दोन पाकळ्या कमी कराव्यात. अशा पद्धतीची विरळणी करावी. तसेच देठाजवळील तीन मण्यांचे गुच्छ कमी करावेत.

द्राक्षवेलींच्या पानांचे कार्य
द्राक्षवेलींच्या पानांचे आयुष्य सुमारे दहा महिन्यांचे असते. तथापि, ६० ते ९० दिवसांच्या वयाची पाने अतिशय कार्यक्षम असतात. ही पाने शेवटपर्यंत निरोगी व कांद्याच्या पातीसारखी हिरवीगार राखणे आवश्यक आहे. कारण, पान हे वनस्पतींचे स्वयंपाकघर आहे. तसेच ती सूर्यप्रकाशात असावीत.

त्या प्रकाशशक्तीचा वापर करून साखर तयार करू शकते. वेलींच्या खोडात, ओलांड्यात, काड्यात, जाड मुळ्यात अन्न साठू शकते. साखरेच्या रूपाने तयार झालेले अन्न साठवून ठेवण्याची व्यवस्था वेलीत नसेल अशी पाने कार्य करीत नाहीत. मणी मोठे होत असताना पानांनी तयार केलेले अन्न त्यांना साठवून ठेवता येत नाही. मण्यात पाणी फिरल्यानंतर १५ ते २० दिवसांत मण्यात साखर खेचण्याचे काम झपाट्याने चालू असते. मण्याकडील ही साखर वाहून नेण्याचे काम पालाश करीत असते. अशा प्रकारे ऑक्टोबर छाटणीनंतर द्राक्षबागेची निगा राखणे आवश्यक असते.

भुरी नियंत्रणाचे उपाय
‘भुरी’ या बुरशीचा नायनाट करण्यासाठी द्राक्ष बागायातदारांनी २०० लिटर पाणी अधिक १५० ग्रॅम बॅलेटॉन अधिक २०० ग्रॅम बाविस्टीन असा घडावर व पानांवर स्प्रे मारावा.

घडातील मण्यांची चांगली फुगवण व्हावी, मम्मीफिकेशन होऊ नये, पिचका मणी होऊ नये, दोडे मणी राहू नयेत, मण्यात चांगला गर भरावा, मणी देठाला कठीण होऊन मण्यांची गळ होऊ नये म्हणून पुढील स्प्रे पाच दिवसांच्या अंतराने द्राक्षवेलींच्या पानांवर व घडावर दोन वेळा द्यावा. २०० लिटर पाणी, १ लिटर विनीन अधिक ४ ग्रॅम जी. ए. (विरघळून घ्यावा) अधिक २०० ग्रॅम बोरॉन अधिक ५०० मि. लि. अगत्य ऍग्रो टॉनिक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *