
Krishi Salla: प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिला आहे.
कापूस व्यवस्थापन:
कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी.
तूर व्यवस्थापन:
काढणीस तयार असलेल्या तूर पिकाची काढणी करावी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
ज्वारी व्यवस्थापन:
रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.
फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी ज्वारी पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
गहू पिकाचे व्यवस्थापन:
गहू पिकास कांडी धरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 40 ते 45 दिवस) व पिक फुलावर असतांना (पेरणीनंतर 65 ते 70 दिवस) पाणी द्यावे. उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी 8 फेब्रुवारी पर्यंत करता येते.
उन्हाळी भुईमूग:
उन्हाळी भुईमूग पिकाच्या पेरणीसाठी एस.बी.11, टीएजी 24, एलजीएन-1, टीएलजी-45, टीजी 26, जेएल 24, जेएल 220 या वाणांपैकी वाणाची निवड करावी.
मका व्यवस्थापन:
वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोऐट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.