Maharashtra CM : राज्यात कोण सत्ता स्थापन करणार आणि कुणाची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागते याकडे सामान्य शेतकऱ्यांसह जनतेचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे सत्तास्थापनेतील राजकीय घडामोडी वेगाने घडताना दिसत असून क्षणाक्षणाला राजकीय पटावरची स्थिती बदलत आहे.
दोन दिवसांपासून देवेंद्र फडणवीस हे भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील अशा चर्चा सुरू असल्या आणि तशा बातम्याही माध्यमांनी दिल्या असल्या, तरी भारतीय जनता पार्टीने अजूनही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केलेला नाही.
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रीपदासह इतरही मागणी केल्याने भाजपाची कोंडी झाली आहे. त्यामुळे मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये होईल तशी स्थिती महाराष्ट्रात होऊ शकते आणि देवेंद्र फडणवीस किंवा अन्य ओळखीच्या चेहऱ्याऐवजी नवाच चेहरा राज्याचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता राजकीय सूत्रानी वर्तविली आहे.
भाजपाच्या अंतर्गत गोटातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले की यंदा मुख्यमंत्री बहुजन समाजाचा होऊ शकतो. तसेच महिलाही मुख्यमंत्रीपदी बसू शकते. त्यातून बहुजन समाजाला आणि महिलांना वेगळा संदेश देण्याची भाजपा शक्यता आहे. तसेच फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास शिंदेंची आणि त्यांच्या गटाची नाराजी भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय मराठा आरक्षणाचा विषय चव्हाट्यावर येऊन राज्यात पुन्हा आंदोलने-मोर्चे यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्रीपदी अनोळखी चेहरा आणि तोही बहुजन असेल, तर मराठा आंदोलकांसह एकनाथ शिंदे यांच्या विरोधातील हवा काढून टाकण्याचे राजकारण साध्य होईल असेही पक्षाला वाटते.
दरम्यान सध्या तरी माध्यमांतून देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपदी नाव नक्की झाल्याचे खात्रीदायक वृत्त येत असून येत्या दोन तीन दिवसात किंवा सोमवारनंतर यासंदर्भातील पक्का निर्णय होऊ शकतो, अशी माहिती जाणकारांनी दिली आहे.