Maharashtra cm candidate: विश्रांतीसाठी गावी गेलेले एकनाथ शिंदे परतल्यावर त्यांनी आज पुन्हा बैठकांचा सिलसिला सुरू केला आहे. दुसरीकडे अजित पवारांशी अमित शाह यांनी भेट टाळली असून त्यांना न भेटताच ते दौऱ्यावर निघून गेल्याने अजित पवार नाराज झाले आहेत. हे सर्व सुरू असताना राज्याचा मुख्यमंत्री (Maharashtra CM candidate) कोण हे अजूनही ठरलेले नाही.
दरम्यान आज दिवसभरात भाजपाचा गटनेता निवडला जाण्याची शक्यता असून देवेंद्र फडणवीस किंवा अन्य भाजपा नेता मुख्यमंत्री होतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर नियोजित मंत्रिमंडळ शपथविधीसाठी जोरात तयार सुरू असून आज किंवा ऐनवेळेस मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित होण्याची शक्यता आहे.
एकीकडे हे सुरू असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये असणार की नसणार? याबाबत अजूनही राजकीय तर्क वितर्क सुरू असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या एक्स वरील पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे?
अंजली दमानिया आपल्या पोस्टमध्ये म्हणतात.,‘‘ परवाच संध्याकाळी, आमच्या काही कार्यकर्त्यांना मी एक पत्रकार भाऊंशी झालेला संवाद सांगत होते. ४ दिवसांपूर्वी PC घेऊन भाजप ला समर्थन देणारे शिंदे अचानक गावी गेले, मग ताप काय आला, मग घरी काय आले, दाल मे कूछ काला है. ते पत्रकार मला म्हणाले की भाजप चीच रणनीती असेल की ह्यांना विरोधी पक्षात बसवावे, त्यांना हवे नको ते सगळे पुरवले जाईल आणि विरोधी पक्ष नेता पण ह्यांचाच . बाकी सगळे साफ. तसेच होतांना दिसतंय. ’’
दमानिया यांनी जरी ही पोस्ट लिहिली असली, तरी एकनाथ शिंदे विरोधात बसणार, सरकारमध्ये की पुन्हा महाआघाडी सोबत सरकार स्थापन करणार, याबाबत अजूनही संभ्रम आहे. असे असले तरी, आज संध्याकाळपर्यंत राज्याच्या मंत्रीमंडळ स्थापनेबद्दल आणि मुख्यमंत्रीपदाबद्दल चित्र स्पष्ट होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.