
मागील आठवड्यात घटलेली आवक या आठवड्यात पुन्हा वाढू लागली खरी, मात्र शुक्रवारपासून राज्यातील आवक कमी होऊन शनिवारी ती १ लाख ५७ हजार क्विंटल इतकी होती. तर रविवारी आणखी घट होऊन ती ७१ हजार ४६४ क्विंटल वर आली. रविवारी पुणे आणि जुन्नर बाजारात चांगली आवक झाली आणि इतर बाजारात कमी, तरीही बाजारभाव मात्र दोन हजार रुपयांच्या खाली घसरलेले दिसून आले.
रविवारी पुणे जिल्ह्यात उन्हाळी कांदयाला १६०० रुपये तर ला कांद्याला १९०० रुपये सरासरी बाजारभाव प्रति क्विंटल मिळाला. नगर जिल्ह्यात उन्हाळी कांद्याला १६०० रुपये, तर लाल कांद्याला १५०० रुपये सरासरी बाजारभाव मिळाला. तर राज्यात इतर बाजारातही कांदा सरासरी १५०० रुपये ते १६०० रुपयांच्या आसपास राहिल्याचे दिसून येत आहे. आवक फार वाढली नाही तरीही वाहतुकीच्या अडचणीमुळे कांदा बाजारभाव घसरत असल्याचे दिसून येत आहे.
कांदा निर्यातदार आणि व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील दीड महिना प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यामुळे कांद्याची रेल्वेने वाहतूक होऊ शकलेली नाही. कारण प्रवासी वाहतूकीचा ताण रेल्वेवर आला आणि कांद्यासह अनेक गोष्टींना त्याचा फटका बसला. रेल्वेने कांदा वाहतूक करण्यासाठी व्यापाऱ्यांना कमी खर्च येतो. तर ट्रकने वाहतूक करण्यासाठी हाच खर्च वाढतो. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक किंवा रस्ते मार्गाने नाशिकहून उत्तरेकडे किंवा प. बंगाल वगैरे राज्यात कांदा पाठविण्यासाठी तिप्पट खर्च येतो. परिणामी हा खर्च शेतकऱ्यांच्या मालातूनच काढावा लागत असल्याने बाजारभाव कमी होत चालले आहे. कुंभमेळा संपताच त्याचा परिणाम जाणवू लागला असून व्यापारी आता रेल्वेने कांदा वाहतुक सुरू करण्याच्या प्रतिक्षेत असल्याने बाजारभाव कमी होताना दिसत आहेत.
बाजारातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार आवक स्थिरावली आणि रेल्वेने वाहतूक पुन्हा सुरू झाली, तर कांद्याचे दर पुन्हा वाढून दोन हजाराच्या आसपास येऊ शकतात.